अभिनेत्री प्रिया बापट हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या प्रियाही नाटकांच्या निर्मितीकडे वळली असल्याचं पाहायला मिळतं. प्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रिया बापट व उमेश कामत ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. सोशल मीडियावरही ही जोडी बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर नेहमीच प्रिया काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा प्रियाला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती सडेतोड उत्तर देताना दिसते.(Priya Bapat On Preganancy)
प्रिया व उमेशच्या लग्नाला १३ वर्ष उलटून गेली आहेत. लग्नाला १३ वर्ष होऊनही या जोडीला बाळ नाही, यावरुन अनेकदा दोघांना प्रश्न विचारले जातात. या प्रश्नावरून अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. “लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल, ते प्रश्न कसे हाताळतेस?” असा प्रश्न ‘हॉटरफ्लाय’च्या मुलाखतीत विचारण्यात आला असता यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? काही महिला आहेत, ज्यांना मुलं नको आहेत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असं वाटतं. माझ्या व उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवं आहे, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार”.
प्रियाने या मुलाखतीत नाटकानंतरचा एक अनुभवही सांगितला. “मी व उमेश एकत्र एक नाटक करत आहोत. नाटकानंतर अनेक लोक भेटायला येतात, एकेदिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आता आम्हाला गुडन्यूज पाहिजे’. मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळाचा विचार कधी करणार’. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका,” असं म्हणत प्रियाने ती वेळ सांभाळली.
पुढे प्रिया म्हणाली, “नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर ‘प्रिया बापट प्रेग्नंट आहे’, अशा कमेंट्स होत्या. अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीवेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्यामते मी प्रेग्नंट आहे,” असं म्हणत प्रिया हसू लागली.