टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेने अध्याप १६ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून अजूनही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आजवर या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पायदेखील घेतला. अशातच आता सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिधवानीनेदेखील या मालिकेला रामराम केला आहे. दोन दिवसांपूर्वी तिचा मालिकेच्या सेटवरील शेवटचा दिवस पार पडला. पलकने शेवटचा दिवस व चित्रीकरणाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केले. तसेच हे फोटों व व्हिडीओ पोस्ट करत तिने भावनिक पोस्टदेखील लिहिली. तिच्या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. (taarak mehta ka oolta chashma new sonu)
पलक गेल्या पाच वर्षांपासून सोनू भिडे ही व्यक्तीरेखा साकारत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिच्यामध्ये आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पलकने ही मालिका सोडल्यानंतर ही भूमिका आता खुशी माळी साकारणार आहे. याबद्दलची माहिती स्वतः निर्माते असित मोदी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, “खुशीला या मालिकेत घेणे योग्य निर्णय होता आणि ती ही भूमिका खूप योग्य प्रकारे करत आहे.”
पुढे ते म्हणाले की, “आम्ही खुशीचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत आणि तिला आम्ही सगळेच जण खूप पाठिंबा देणार आहोत. ती देखील या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षक तिला तेच प्रेम देतील जे गेल्या १६ वर्षापासून देत आले आहेत”.
त्याचप्रमाणे खुशीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, “सोनूची भूमिका करताना खूप मजा येणार आहे, तसेच ‘तारक मेहता…’ भाग होणं खूप भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे”. दरम्यान आधीच्या सोनूबद्दल म्हणजे पलकबद्दल सांगायचे झाले तर तिच्यामध्ये आणि निर्मात्यांमध्ये कायदेशीर कारवाई सुरु आहे. पलकने करार मोडल्याचे आरोप निर्मात्यांनी केले होते तर पलकने कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर तिच्या समस्यांमध्ये वाढ केल्याचे आरोप केले होते.