Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. यंदाचे हे पर्व कलाकार मंडळींसह रील स्टार, रॅपर, गायक या सर्व क्षेत्रातील कलाकार मंडळींनी रंजक केलं. यंदाच्या या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरु असून अगदी दोन दिवसांवर महाअंतिम सोहळा पार पडणार असल्याचे समोर आलं आहे. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचे नसून ७० दिवसांचे असणार असल्याचं ‘बिग बॉस’ यांनी अधिकृतरित्या घोषित केलं. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात आता सात स्पर्धक उरले असतानाच मिडविक एविक्शन झालेलं पाहायला मिळालं. या मिडविक एविक्शनमधून एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं आणि हा स्पर्धक म्हणजेच वंडरगर्ल अभिनेत्री वर्षा उसगांवकर.
‘बिग बॉस’च्या घरातील ६७ व्या दिवशी वर्षा यांचा प्रवास संपला आणि त्यांना घराबाहेर पडावे लागले. ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलेलं पाहायला मिळालं. दरम्यान, कुठेही वय मध्ये न आणता त्या प्रत्येक टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाच्या बरोबरीने उभ्या राहिल्या आणि खेळताना दिसल्या. आता घराबाहेर पडल्यानंतर वर्षा यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेली पहिली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
वर्षा यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखलं नाही तर मी आपलं सामर्थ्य, धैर्य व संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला. नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की, प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शोमधून तुमचा निरोप घेत आहे. पण, मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील. माझ्या प्रिय प्रेक्षकांना, प्रेम आणि फक्त प्रेम. तसेच ‘बिग बॉस मराठी’, ‘एन्डमोलशाईन इंडिया’, ‘कलर्स मराठी’, ‘जिओ सिनेमा’ आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार”. वर्षा यांच्या त्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.