मराठी चित्रपट ‘पछाडलेला’ हा चित्रपट न पाहणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असेल. २००४ साली आलेल्या या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली असून आजही सगळ्या मराठी प्रेक्षकांना त्यातील संवाद तोंडपाठ आहेत. अभिनेते महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, अभिराम भडकमकर, अश्विनी कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट होती. मात्र यामध्ये सर्वात लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे बाब्या. ‘बाबा लगीन’ म्हणत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. हा अभिनेता म्हणजे अमेय हुनसवाडकर. (ameya hunaswadkar health)
अमेयने आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आहे. यामध्ये त्याने अभिनयाची सुरुवात कशी झाली? याबद्दल सांगितले. महेश यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका कशी मिळाली? तसेच त्यानंतर आयुष्यात कोणते बदल झाले? याबद्दल सांगितले आहे.
अमेयने ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या चित्रपटामध्ये रणबीर कपूरसहित दिसला होता. या चित्रपटामध्ये असलेले मित्रमंडळी अजूनही त्याच्या संपर्कात असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे. याचवेळी त्याने त्याला आलेल्या आजारपणाबद्दल भाष्य केले आहे. त्याने सांगितले की, “मी २०२३पासून खूप आजारी होतो. या काळात श्याम म्हशेळकर, अकुल त्रिपाठी, मनोज जाधव आणि अजून काही मित्र आहेत ज्यांनी मला आजारपणात खूप साथ दिली. माझे आई-बाबा नसल्यामुळे या मित्रांनीच मला मदत केली. मला चालता-फिरता यायचं नाही. मी झोपून होतो. त्यामुळे त्यावेळीही ते माझ्याबरोबरच राहिले. अनेकदा ते रात्री झोपायला असायचे”.
त्यानंतर त्याला विचारले की, “या काळामध्ये तुझ्या आजारपणाबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये कोणाला काही कळू दिले नाहीस का?”, त्यावर त्याने सांगितले की, “मी जास्त कोणाला काही बोललो नाही. तसेच अनेकदा मला चुकीचे डॉक्टर व चुकीचे उपचारदेखील मिळाले. त्यामुळे मला अधिक त्रास झाला. पण यामध्ये हेच चार मित्र म्हणजे श्याम, अकुल, पंकज विष्णु, विश्वनाथ चॅटर्जी हे माझ्याबरोबर होते. माझ्या तपासणीपासून कुठेही जायचं असेल तेव्हा हे माझ्याबरोबर असायचे. डॉक्टर म्हणायचे की नातेवाईक लागतील. पण ते जवळपास नसल्याने हे मित्रच माझ्याबरोबर होते”.
दरम्यान अमेयच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याने ‘मी सिंधुताई सपकाळ’ ‘पछाडलेला’, ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘नायक’ व ‘रॉकी’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक हिंदी कलाकारांबरोबर जाहिरातींमध्येही काम केले आहे.