Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात या घरात नॉमिनेशन टास्क पार पडते आणि या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांचे या घरातील स्थान कसं कमी आहे हे सिद्ध करतो आणि स्वत:ला वाचवून इतरांना नॉमिनेट करतो. अशातच सोमवारच्या भागातही ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण बारा सदस्यांपैकी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या काही निकषांवर हा नॉमिनेशन टास्क पार पडला. सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस’ने या घरातून नॉमिनेशनसाठी निर्णय क्षमता, खेळाची समज आणि मतप्रदर्शन हे तीन निकष नेमून दिले होते आणि या निकषांच्या आधारावर घरातील सर्व सदस्यांनी नॉमिनेशनचा टास्क पर पडला. सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं आहे. त्यानुसार हा आठवडा कठीण असल्याचे या टास्कवरुन दिसून आलं. नॉमिनेशन टास्कसाठी घरातील स्पर्धकांना बाहेर जाणाऱ्या सदस्यांचे फोटो असलेले पोस्टर फाडून ते कचऱ्याच्या पेटीत टाकायचे होते. घरातील नॉमिनेट सदस्यांची पोस्ट कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आली असून या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
कलर्स मराठीने नॉमिनेटेड सदस्यांची पोस्ट शेअर केली असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये या नॉमिनेटेड सदस्यांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. याच पोस्टवर अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक पुष्कर जोगनेही कमेंट करत त्याचे मत व्यक्त केलं आहे. या पोस्टखाली कमेंट करत त्याने असं म्हटलं आहे की, “या आठवड्यात कदाचित घन:श्याम घराबाहेर पडेल आणि पुढच्या आठडव्यात डीपी म्हणजेच धनंजय पोवार”. पुष्करने शेअर केलेल्या या कमेंटला नेटकऱ्यांनीही अनेक कमेंट्स करत उत्तर दिलं आहे.

पुष्करने शेअर केलेल्या कमेंटवर एका नेटकऱ्याने डीपीला पाठींबा देत “पुष्कर डीपीदादा टाॅप 3 मध्ये येणार असा महाराष्ट्र म्हणतोय. त्यामुळे तुम्ही भविष्यवाणी न केलेली बरी”, “कोल्हापूर नाव माहीत आहे ना? डीपी दादा टॉप 5 मध्ये असणार” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काही नेटकऱ्यांनी “कोण घरात राहणार आणि कोण बाहेर पडणार हे तुम्ही सांगू नका ते जनता ठरवेल”, “लोक ठरवतील डीपी व घन:श्याम कधी बाहेर जाणार? तुम्ही सांगायची गरज नाही” असं म्हटलं आहे. यापैकी काही कमेंटला पुष्करने उत्तरदेखील दिलं आहे. पुष्यरने “डीपी माझाही आवडता स्पर्धक आहे पण त्याने अजून चांगला गेम खेळला पाहिजे” असं म्हटलं आहे.