टेलिव्हीजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदी कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. गेली सहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कोरोना काळातदेखील या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. नंतर या कार्यक्रमाने भारताबाहेरही अनेक कार्यक्रम केले आहेत. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये कार्यक्रम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हे सगळे शो हाऊसफुलदेखील होतात. आता पुन्हा एकदा ‘हास्यजत्रा…’ची टीम अमेरिका दौऱ्यावर निघाली आहे. (maharashtrachi hasyajatra america tour)
‘महाराष्ट्राची…’टीमचा अमेरिका दौऱ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. अशातच आता या टीममधील सगळे कलाकार मंगळवारी रात्री अमेरिकेसाठी रवाना झाले. सर्व कलाकार कुटुंबाचा निरोप घेत मुंबई विमानतळावरून निघाले. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता ईशा डेने तिच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ व फोटो शेअर केले आहेत. यामध्ये समीर चौघुले, प्रभाकर मोरे, चेतना भट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, दत्तू मोर असे कलाकार दिसून येत आहेत. तसेच प्रसादनेदेखील त्याच्या सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने व्हिडीओ शेअर करत, “अमेरिका कॉलिंग, महाराष्ट्राची हास्यजत्रा लाईव्ह सीझन २ युएसए टुर”, असे कॅप्शन दिले आहे. तसेच पॅरिस एअरपोर्टवर तालिम करतानादेखील दिसत आहेत.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ११ शहरांमध्ये हा शो होणार असून १९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. लॉस एंजलिस, शिकागो,. बोस्टन, ऑस्टीन, सिएटल अशा अनेक शहरांमध्ये शो होणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक असलेलेदेखील पाहायला मिळत आहेत.
त्यांचे परदेशात जातानाचे व्हिडीओ व फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी संपूर्ण दौऱ्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. तसेच नम्रता संभेरावनेदेखील मुलाबरोबरचा फोटों शेअर करत ‘मिस यु माय बॉय’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष अमेरिका दौऱ्याकडे लागले आहे.