गेले काही दिवस सर्वत्र पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई, महाराष्ट्रासह उतार अनेक ठिकाणी पावसाने हाहाकर माजवला आहे. अशातच जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये अभिनेत्री अडकली आहे. वृत्तानुसार, ती तिचा पती रोनित बिस्वास आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यासह तेथे बांधलेल्या आर्मी कॅम्पमध्ये राहत आहे. ही अभिनेत्री बद्रीनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी गेली होती आणि परतत असताना रस्त्यात दरड कोसळल्यामुळे अभिनेत्री अडकली आहे. ५ जुलै रोजी तिच्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती बद्रीनाथला गेली. तिच्याबरोबर तिचा नवरा, तिचा पाळीव कुत्रा आणि चुलत भाऊही होता.
‘ईटाईम्स’शी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, “चार दिवस तिथे अडकल्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे. मला काशीपूरमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचे आहे. मला आशा आहे की, आम्ही लवकरच बाहेर पडू कारण मला माझ्या वचनबद्धतेचे उल्लंघन करणे आवडत नाही”. पुढे तेथील सद्यस्थितीबद्दल बोलताना कविता कौशिक म्हणाली की, “महामार्गावर हजाराहून अधिक गाड्या अडकल्या आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि सीमा रस्ता संघटना सातत्याने काम करत आहेत. तथापि, प्रत्येक वेळी त्यांनी भूस्खलन साफ केल्यावर दुसरे भूस्खलन होते. भीषण परिस्थिती असूनही, ते सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहेत”.
यापुढे तिने असं म्हटलं की, “रेस्टॉरंट आणि हॉटेलवले वॉशरूमला जाण्यासाठी २०० रुपये घेत आहेत. आर्मीच्या लोकांना याबद्दल माहीत झाले तेव्हा त्यांनी हॉटेलवाल्यांना पर्यटकांची मदत करण्यास सांगितले. इथे अनेक गाड्या थांबल्या आहेत, त्यामुळे आता इथे नक्की किती जण अडकले असतील याची कल्पना करु शकत नाही”.
दरम्यान, ‘एफआयआर’मधील चंद्रमुखी चौटेलाच्या पात्राने कविता कौशिक घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय तिने ‘वो तेरा छलावा’, ‘कुटुंब’ आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून काम केले आहेत. तिने ‘नच बलिए ३’, ‘बिग बॉस १४’ आणि इतर रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.