Ajinkya Deo On Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं गुरुवारी (२४ ऑगस्ट) निधन झालं. सीमा यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला दुःखद धक्का बसला. तसेच देव कुटुंबियांनाही हे दुःख पचवणं कठीण झालं. सीमा यांचा मुलगा व अभिनेता अजिंक्य देव व अभिनय देव पूर्णपणे कोलमडून गेले. अल्झायमर या आजाराने सीमा देव गेली काही वर्ष त्रस्त होत्या. अखेरीस त्यांची या आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. अजिंक्य देवनेच आईच्या आजारपणाची माहिती दिली होती. (Seema Deo Passes Away)
गुरुवारी सीमा देव यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठीतील काही मंडळींनी उपस्थिती दर्शवली. तर देव कुटुंबियांना सीमा देव यांना शेवटचं पाहताना अश्रू अनावर झाले. भरत जाधव, अजय गोगावले सीमा देव यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते.
सीमा देव यांचे अंतिम संस्कार पार पडल्यानंतर अजिंक्य देवने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे व चाहत्यांचे आभार मानले. शिवाय बाबा गेल्याचं दुःखही त्याने बोलून दाखवलं. अजिंक्य देव म्हणाला, “काय बोलणार? आणि मी याक्षणी काय सांगणार?. बाबा होते. पण तेही गेले. संपूर्ण महाराष्ट्राने आमच्या कुटुंबाला भरभरुन प्रेम दिलं”.
“तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असाच आमच्या पाठिशी असावा. यापुढे आम्हालाही असंच प्रेम द्या. आई-बाबांनी नेहमीच तुमचं मनोरंजन केलं. त्याचप्रकारे आम्हीही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच मनोरंजन आम्ही करु. तुमचं अधिकाधिक प्रेम आम्हाला लाभो. याक्षणी एवढंच मी म्हणेन आणि तुम्हा सगळ्यांचे आभार”. आई गेल्यानंतर देव कुटुंबियांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचंही यावेळी अंजिक्य देवने बोलून दाखवलं.