मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या देखणे रूप आणि सर्वांगसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले आहे. त्या ८१ वर्षाच्या होत्या. बऱ्याच काळापासून त्या आजारपणाशी झगडत होत्या. ‘या सुखांनो या’, ‘माझी आई’, ‘जिवा सखा’, ‘कुंकू’ या मराठी चित्रपटांमध्ये सीमा देव दिसल्या आहे. तसेच, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रुपेरी पडद्यावर साकारलेल्या सीमा देव यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. (Mahesh Kothare on Seema Deo Death)
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर व्यक्त होताना ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी एक आठवण सांगितली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना महेश कोठारे म्हणाले, “खरंच खूप वाईट वाटलं. त्या आजारी होत्या, पण एक उत्कृष्ट कलावंत आपल्यातून निघून गेल्या, याचं खूप वाईट वाटतं. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. कारण त्यावेळी माझ्या आईनेसुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं होतं. ‘शोधा म्हणजे सापडेल’ या चित्रपटात माझी आई सरोज व सीमा देव यांनी काम केलं आहे. त्या चित्रपटामध्ये रमेश देवही होते.”
हे देखील वाचा – “तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?
महेश कोठारे यांनी सीमा देव यांना ‘चिमणी पाखरं’ चित्रपटासाठी विचारले होते. याचा खुलासा करताना महेश कोठारे म्हणाले, “जेव्हा मी ‘चिमणी पाखरं’ चित्रपट केला होता, तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो. मला या चित्रपटात रमेश व सीमा देवही हवे होते. पण त्यावेळी सीमा देव यांनी चित्रपटसृष्टीमधून निवृत्ती घेतली होती. खूप खूप सुंदर कलावंत होत्या. रुपेरी पडद्यावर त्यांना पाहिलं की, कोणतीही भूमिका सीमा देव करु शकतात असं वाटायचं. मराठीसह हिंदीमध्येही त्यांनी खूप नाव कमावलं. ‘आनंद’ चित्रपटामध्येही रमेश व सीमा देव यांनी सुंदर काम केलं होतं. आपले मराठी कलाकार त्यावेळी हिंदीमध्ये काम करुन नाव कमावत आहेत तीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.” (Mahesh Kothare on Seema Deo Death)
हे देखील वाचा – चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर सीमा देव यांनी बदललं होतं स्वतःचं नाव, पण त्यांचं खरं नाव नेमकं काय?
अभिनेत्री सीमा देव यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे आयुष्यभराचे जोडीदार झाले. या जोडीने अनेक चित्रपट गाजवली असून त्यांच्या या जोडीला चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट व आदर्श जोडी म्हणून ओळखली जात असे.