काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिघे एका पत्रकार परिषदेत एकमेकांशी बोलत असताना एकनाथ शिंदे हे त्यावेळी “बोलून मोकळं व्हायचं फक्त” असं बोलताना दिसले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटत असून अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचे यावेळी बोलले जात आहे. मात्र, हे सर्व घडल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम हे कवितेबरोबर अभिनयासाठीदेखील ओळखले जातात. ते त्यांच्या कवितांच्या माध्यमातून अनेक राजकीय व सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करत असतात. त्यांच्या कवितेचे सर्वत्र चाहते आहे. याच कवी सौमित्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक कविता पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव न घेता आपलं मत व्यक्त केलं आहे. (Kavi Saumitra share a Post on Current situation)
हे देखील वाचा – “आपल्या घरातलं माणूस…”, अडीच वर्षानंतर मालिकेमध्ये परतल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यातलं कोणीतरी…”
कवी सौमित्र त्यांच्या कवितेमध्ये म्हणाले,
“आपण बोलून निघून जायचं ..
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय ..
सौमित्र.”
हे देखील वाचा – “तुझ्याशिवाय हे घर…”, अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन, भावुक होत म्हणाला, “मी तुझ्याशिवाय…”
या कवितेसह सौमित्र यांनी माईकचा फोटो शेअर केला आहे. सौमित्र यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून कमेंट्सद्वारे ते आपले मत मांडताना दिसत आहे. एक नेटकरी यामध्ये म्हणतो, “आसूड! खरंच आपल्याला काय उरलीच नाय, सत्ता भोगून मोकळं होऊन जायचं!”. तर आणखी एक नेटकरी यावर म्हणाले, “व्यक्त होण्यासाठी प्रेरणा देताय तुम्ही…”. तर अनेक नेटकरी सौमित्र यांच्या कवितेचे कौतुक करताना दिसत आहे.