काही काही गोष्टींबद्दल आता ‘शाॅक ‘ व्हायचे नाही असं ठरवलंय. मनोरंजन क्षेत्रात शाॅक प्रूफ असणे फार गरजेचे आहे. असाच एक फंडा, मुंबई तर झालेच पण महाराष्ट्रातील, देशातील जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद होत जाणे. व्हिडिओ थिएटर्स, एन्टरटेन्मेन्ट चॅनेल, मल्टीप्लेक्स, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, ओटीटी अशी एकेक करत चित्रपट पाहण्याची नवीन आधुनिक माध्यमे येत गेली तस तसा एकेक सिंगल स्क्रीन थिएटरवर ‘पडदा ‘ पडत गेला. आणि मग आज नाझ थिएटर बंद, मग नाॅव्हेल्टी बंद अशा बातम्यांची सवय झाली. त्याच सवयीनुसार आज समजले की चर्चगेट येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणचे इंग्रजकालीन असे इराॅस थिएटरही बंद होतेय. १९३८ साली ते सुरु झाले. अतिशय देखणं आणि रुबाबदार असे इराॅस प्रामुख्याने इंग्लिश पिक्चरचे होते. कालांतराने तेथे सातत्याने हिंदी चित्रपटही प्रदर्शित होऊ लागले.(Eros Theater Controversy)
इराॅसमध्ये मेन थिएटर व मिनी थिएटर अशा दोन गोष्टी होत्या. मिनी थिएटर खरोखरच मिनीच होते. अवघ्या पस्तीस सीटस होत्या. पण वेताच्या आणि प्रशस्त होत्या. अतिशय आरामात बसून पिक्चर एन्जाॅय करावा असे होते. ते मिनी थिएटर काही वर्षांपूर्वी बंद पडले तर आता मेन थिएटर बंद होणार असल्याची बातमी आहे. तसे ते २०१९ पासूनच बंद आहे. आणि तेव्हापासून इराॅसच्या मेन गेटला कव्हर करण्यात आले आणि अंतर्गत रचना बदलणार अशी बातमी होती. तेही चालले असते.

इराॅस मिनी थिएटरमधल्या प्रेस शोच्या काही आठवणी सांगायला हव्यात. ‘काफिला ‘ नावाच्या चित्रपटात असलेला उदय टीकेकर शो संपताच आम्हा सिनेपत्रकाराना भेटायला आल्याचे मला आजही आठवतेय आणि विशेष म्हणजे याचे त्याला आजही कौतुक आहे. सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गंमत जमंत’च्या ( १९८७) प्रेस शोला वर्षा उसगावकर आपल्या आईसोबत आवर्जून हजर होती हे आठवतेय. ‘वंडरगर्ल ‘ अशी तिला त्याच वेळी उपाधी दिल्याने तिची उपस्थिती लक्षवेधक ठरली. तिला तेव्हा दिलेले हे बिरुद आजही कायम आहे हे विशेषच! मी आले निघाले हे तिच्यावरचे गाणे सुरु होताच तिला अधिकच आनंद झाला. मध्यंतरात तिला आम्हा समिक्षकांकडून उत्तम दादही मिळाली. ‘ब्रह्मचारी ‘ या नाटकातील तिचा उत्स्फूर्त परफाॅर्म आणि नाटकाचे खणखणीत यश यामुळे ती ‘स्टार ‘ होती. आणि आजही स्टार आहे.
संजय दत्त, नम्रता शिरोडकर, रिमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव ‘चा ( १९९९) प्रेस शो संपल्यावर आम्हा समिक्षकांचे मत जाणून घेण्यास दिग्दर्शक महेश मांजरेकर आला होता. त्याला विलक्षण कुतूहल होते की आम्ही समिक्षक त्याच्या चित्रपटावर काय बोलतोय. ‘वास्तव ‘ संपून आम्ही बाहेर यायला आणि महेश मांजरेकरचे यायला एकच गाठ पडल्याने त्याला आमच्या चेहर्यावरुनच समजले की , चित्रपट आम्हाला आवडलाय. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल ‘च्या ( १९९९) प्रेस शोच्या मध्यंतरमध्ये चित्रपटाच्या पीआरओकडून हळूच निरोप मिळाला, सिनेमा संपल्यावर सनी देओलने काही निवडक समिक्षकांसाठी मागच्याच तारांकित हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे तेव्हा थांब. असं थांबल्याने सनी देओलची भेट घेता आली. तोच यजमान असल्याने आम्हा प्रत्येकाला भेटला. चित्रपट कसा वाटला वगैरे त्याने आवर्जून विचारले. तेव्हा त्याला एका सुपर हिट चित्रपटाची असलेली गरज ‘घायल ‘ने पूर्ण केली. घायल आजही चर्चेत असतो. सनी देओलची ही भेट अनपेक्षित आणि सुखावह. (Eros Theater Controversy)

दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे इराॅस अतिशय फेवरेट. त्याचे रंगीला, मस्त, सत्या, जंगल येथेच मेन थिएटरला रिलीज झाले. रंगीला व सत्या आजही सुपर हिट आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा ‘लगान ‘ ( २००१) पाह्यला पहिल्याच आठवड्यात दिलीप वेंगसरकर याच इराॅसमध्ये ‘लगान ‘ पाह्यला आला त्याची मोठी बातमी झाली. इराॅसबाहेर एका इंग्रजी वृत्तवाहिनीची भली मोठी व्हॅन उभी होती हे आठवतेय. ती लाईव्ह न्यूज ठरली. शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर ‘ या चित्रपटांचे मेन थिएटर इराॅस हे होते. तेव्हा शिवसेनेने आंदोलन करुन हा चित्रपट बंद पाडला होता. इराॅसच्या मिनी थिएटरमध्ये कधी सकाळी इंग्रजी चित्रपटाचे प्रेस शो असत तर कधी सेन्सॉरसाठीचेही शो होत. म्हणजे याचा कार्यविस्तार खूप होता. इतिहासही मोठाच आहे.

महेश कोठारे दिग्दर्शित आणि ‘चिमणी पाखरं ‘( २००१) या यशस्वी मराठी चित्रपटाचा एक खास खेळ नियमित शोला आयोजित करण्यात आला होता आणि त्याला भरपूर गर्दी झाली होती. या चित्रपटात रमेश देव, सचिन खेडेकर, पद्मिनी कोल्हापूरे, बाळ धुरी, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, तुषार दळवी, रेशम इत्यादींच्या भूमिका आहेत. इराॅसला एक आठवड्यासाठी का होईना पण प्रदर्शित झालेला हा एकमेव मराठी चित्रपट. इराॅसला पिक्चर हाऊसफुल्ल असल्यावर ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट मिळतेय का याकडे कान द्यावा लागे आणि आवाजावर डोळे लावून त्या दिशेने जावे लागे. पण समोरच्या कार पार्किंगमधील सॅन्डवीचवाल्याशी परिचय वाढला की किमान एक तिकीट एक्स्ट्रात मिळे.
इराॅस थिएटर बंदच्या बातमीने अशा काही गोष्टी आठवल्या…
दिलीप ठाकूर