Devendra Fadnavis on Emergency Movie : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखा मिळाल्यानंतर आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना रनौत दिग्दर्शित आणि निर्मित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अभिनेत्री कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहिला. त्यानंतर मुख्यमंत्री साहेब मंचावर पोहोचले आणि आणीबाणीचे सत्य दाखवल्याबद्दल रनौत यांचे कौतुक केले.
एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चित्रपट बनवल्याबद्दल मी कंगना रनौतचे मनापासून अभिनंदन करु इच्छितो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणीबाणीचा काळ असा होता जेव्हा सर्व लोकांचे मानवी हक्क हिरावले गेले. यावेळी मी वडिलांना भेटायला तुरुंगात कसा जायचो ते मला अजूनही आठवते. माझे वडील आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते आणि मी फक्त पाच वर्षांचा होतो. ते पुढे म्हणाले की, कंगना रनौतने चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांमध्ये आणीबाणीचे युग आणले आहे. या चित्रपटातील कंगना जीची भूमिका कौतुकास्पद आहे.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ होणार? ‘या’ कलाकारांना मिळाली आहे सरकारकडून X, Y आणि Z सुरक्षा कारण…
पुढे ते म्हणाले, “इंदिराजी आमच्यासाठी खूप मोठ्या असल्या तरी त्या देशासाठी नेत्या होत्या पण त्यावेळी त्या आमच्यासाठी खलनायक होत्या. मला असे वाटते की आणीबाणी ही आपल्या देशाच्या इतिहासातील काळी रात्र आहे, हे सत्य देशवासीयांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. येणाऱ्या पिढीला आणीबाणीचे सत्य कळले पाहिजे असे मला वाटते. हा चित्रपट १७ जानेवारीला भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संपूर्ण भारतात आणीबाणी लागू केली होती आणि याच गोष्टीवर हा चित्रपट आधारित आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. कंगना रनौतच्या चित्रपटाबाबत काँग्रेसने यापूर्वीच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, तर पंजाबमधील एसजीपीसीने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.