‘सर्व्हायकल कॅन्सर’, पूनम पांडेच्या निधनाच्या खोट्या वृत्तामुळे हा शब्द अनेकांच्या ओळखीचा झाला आहे. ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणजेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी तिने आपल्या निधनाचे खोटे वृत्त पसरवले आणि यामुळे या गंभीर आजाराविषयी सर्वांना नव्याने माहिती झाली. अशातच बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री या आजाराशी झुंज देत आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री डॉली सोही सध्या या आजारामुळे अडचणी व अनेक वेदनांमधून जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. अभिनेत्री गेल्या काही महिन्यांपासून या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. अशातच काल (२० फेब्रुवारी) रोजी अभिनेत्रीची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार, डॉली सोहीला श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉली सोहीची केमिओथेरपी सुरू होती, त्यामुळे तिला अशक्तपणा जाणवत होता, यामुळे तिला काम करणेही शक्य होत नव्हते. डॉली नुकतीच टीव्ही शो ‘झनक’मध्ये दिसली होती, मात्र प्रकृतीच्या कारणामुळे तिने हा शो सोडला.
डॉली सोहीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “प्रार्थना हे जगातील सर्वात मोठे वायरलेस कनेक्शन आहे. त्यामुळे माझ्या या कठीण काळात मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे” असं म्हटलं होतं. अशातच अभिनेत्रील आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण सध्या तिची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
दरम्यान, डॉलीने ‘देवों के देव महादेव’, ‘हिटलर दीदी’, ‘कुसुम और भाभी’, ‘कलश’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, खूब लडी मर्दानी’ व ‘झांसी की रानी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती ‘झनक’ या मालिकेमध्ये दिसली होती. या मालिकेत डॉली सृष्टी मुखर्जीची भूमिका साकारत होती, मात्र आजारपणामुळे तिने या मालिकेचा निरोप घेतला.