मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवाल अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिने २० फेब्रुवारी मंगळवार रोजी बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लगीनगाठ बांधली. दिव्या व अपूर्व यांनी मराठी परंपरांनुसार लग्न केले. अशातच या नववधूवराची पहिली झलक समोर आली आहे. दिव्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. दोघांनीही कोणताही थाटमाट वा दिखावेपण न करता अत्यंत साधेपणाने मुंबईत लग्नसोहळा उरकला. (Divya Agarwal And Apurv Padgaonkar Wedding)
दिव्या अग्रवालने तिच्या खास दिवसासाठी जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर अपूर्वही बायकोला मॅचिंग अशा आउटफिटमध्ये दिसला. कमीतकमी मेकअप लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत होती. फोटो शेअर करताना दिव्या अग्रवालने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या क्षणापासून आमची प्रेमकथा सुरुचं आहे.” लग्नानंतर नवविवाहित जोडपं कॅमेऱ्यासमोर आलं तेव्हा दिव्याच्या खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अपूर्वने त्याच्या लग्नात पत्नीसाठी असे काही केले, जे पाहून नक्कीच भावूक व्हायला होईल. त्याने संपूर्ण लग्नात दिव्याच्या वडिलांचा चष्मा लावला होता. दिव्याच्या वडिलांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. लग्नात अपूर्वाने ग्रँड एन्ट्री केली. यावेळी तो त्याच्या दोन पाळीव श्वानांसह लग्नस्थळी पोहोचला. दिव्याच्या हळदी समारंभांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये ती निळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती.
मात्र या समारंभासाठी केलेल्या सजावटीबद्दल अनेक चर्चा होत आहेत. या सजावटीमध्ये चिप्सच्या पॅकेट्सचा वापर केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे दिव्या व अपूर्वच्या हळदीतील लूकपेक्षा त्यांच्या हळदी समारंभातील डेकोरेशनची चर्चा अधिक रंगली. दिव्या व अपूर्वच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांनीही लग्न करण्याची घोषणा केल्यानंतर दिव्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.