सध्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. टीझर आल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. अशातच गेल्या शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर आला. तेव्हापासूनच हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे आणि या चित्रपटामुळे अभिनेता प्रसाद ओकही चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. तर दुसऱ्या भागातदेखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी त्याचं कौतुक केलं होतं.
‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे सध्या प्रसाद ओक हा अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. याचनिमित्ताने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रसादला ‘हाययेस्ट पेड अभिनेता’ (सर्वाधिक मानधन घेणारा) असण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने त्याच्या ‘हाययेस्ट पेड अभिनेता’ असण्यापेक्षा मी Highest Viewed (सर्वाधिक पाहिला गेलेला), Highest Read (सर्वाधिक वाचला गेलेला) आहे का? हे जाणून घेण्यात मला रस असल्याचे सांगितले.
यावेळी प्रसाद असं म्हणाला की, “हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यू अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का? हे दोन माणसांना विचारायला पाहिजे. एक म्हणजे मंजिरी ओक, कारण ती माझा सगळा व्यवहार सांभाळते आणि दुसरे म्हणजे मंगेश देसाई जे ‘धर्मवीर’चे निर्माते आहेत. ही दोन लोकं याबद्दल सांगू शकतील”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल की, मी हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट वह्यूड (Highest Viewed) आहोत का यात मला रस आहे. आपण Highest Read (सर्वाधिक वाचला गेलेला) अभिनेता आहे का?, आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते. तो मुद्दा महत्त्वाचा नाही”