प्रसिद्ध पाकिस्तानी गायक व संगीतकार राहत फतेह अली खान यांच्या अटकेची बातमी समोर आली. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांच्या माजी व्यवस्थापकाने केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून राहत यांना काल, २२ जुलै सोमवार रोजी दुबईत अटक करण्यात आल्याचे वृत्त जारी झाले होते. वृत्तानुसार, राहत सोमवारी सकाळी लाहोरहून दुबईत आले होते. परंतु पोलिसांनी त्याला इमिग्रेशन केंद्रात ताब्यात घेतले आणि तक्रारीच्या आधारे चौकशी आणि औपचारिक आरोपांबद्दल बुर्ज दुबई पोलिस ठाण्यात नेले.
यानंतर प्रसार माध्यमांमध्ये राहत यांच्याविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, राहत यांनी स्वतः त्यांच्या अटकेबद्दलचे वृत्त नाकारले असून माझ्याविरोधात शत्रूंनी उगाच अफवा पसरवल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्यांनी त्यांच्या अटकेबद्दल तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत अटकेबद्दलच्या अफवार नाकारल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये त्यांनी आपण आपल्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी दुबईला आल्याचे म्हटले आहे. तसेच “सर्व काही ठीक आहे आणि चाहत्यांनी माझ्या अटकेच्या अफवांवर अजिबात लक्ष देऊ नये. माझ्या शत्रूंनी माझ्याविरुद्ध ही खेळी खेळली आहे. त्याला अजिबात बळी पडू नका. मी लवकरच माझ्या देशात परत येईन आणि माझ्या नवनवीन गाण्यांनी तुम्हाला आश्चर्यचकित करेन” असं म्हटलं आहे. राहत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका छतावर बसले असून ते दुबईमध्येच असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चर्चांनुसार, दुबईतल्या बुर्ज दुबई पोलीस स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र तसे काही नसल्याचे स्वतः राहत यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे आणि त्यांच्या अटकेचे वृत्त नाकारले आहे.