झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेच्या कथानकामुळे तसेच मालिकेतील कलाकारांमुळे या मालिकेला विशेष स्थान मिळालं. या मालिकेतील एक पात्र विशेष गाजलं. नकारात्मक भूमिकेत असणार हे पात्र म्हणजे धनश्री काडगांवकर. धनश्रीने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विशेषतः नकारात्मक भूमिका साकारत तिने तिचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. (Dhanashri Kadgaonkar Post)
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत धनश्रीने वहिनीसाहेब हे पात्र साकारलं होतं. या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचली. यानंतर ती ‘तू चालं पुढं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पाहायला मिळाली. या नव्या मालिकेतही धनश्री नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत तिने साकारलेलं शिल्पी हे पात्र विशेष गाजलं. अभिनयाशिवाय धनश्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
मालिकेचं शूटिंग संपल्यानंतर धनश्री तिच्या घरी पुण्याला गेली आहे. धनश्री ही मूळची पुण्यातील आहे. मात्र चित्रीकरणामुळे तिला मुंबईत राहावं लागत आहे. पुण्याला गेल्यानंतर ती तिचा मोकळा वेळ काही खास जागा शोधून तेथे घालवण्यात व्यस्त आहे. सोशल मीडियावरुनही चाहत्यांकडून तिने याबाबतचा अंदाज घेतला. धनश्रीने सोशल मीडियावरुन पुण्यातील न माहित असलेली भेट देण्यासारखी जागा कोणती आहे असा सवाल विचारत सेशन घेतलं होतं. यावेळी तिच्या चाहत्यांनी अनेक ठिकाणांची नाव सांगितली.
या सेशन दरम्यान तिच्या अनेक चाहत्यांनी तिला तिचे व तिच्या लेकाचे फोटो देखील पोस्ट करण्यास सांगितले. यावेळी एका नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या नेटकऱ्याने या सेशनमध्ये विचारलं की, “अंतर्वस्त्र घातलेला फोटो दाखवा मॅडम”, यावर धनश्रीने “काय करायचं अशा लोकांचं” असं उत्तर देत ही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे. नेटकऱ्यांच्या ट्रोल करण्याची हद्द पार करत नेटकऱ्याने केलेला हा प्रश्न साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.