‘महाभारत’ मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारत घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. घरगुती वादामुळे नितीश भारद्वाज चर्चेत आले आहेत. दरम्यान नितीश हे त्यांच्या बायकोपासून वेगळे राहत आहेत. अशातच त्यांनी IAS पत्नी स्मिता भारद्वाजवर आपल्या मुलींना भेटू देत नसल्याचा आरोप केला. नितीश यांनी केलेल्या आरोपांनंतर आता त्यांच्या पत्नी स्मिता यांनी मौन सोडलं आहे. (Nitish Bhardwaj Wife Statement)
स्मिता यांनी यावर भाष्य करत म्हटलं आहे की, “ते या महिन्यात मुलींना भेटले होते. त्यांनी घटस्फोटाच्या बदल्यात पैशांची मागणी केली. कोर्टाच्या आदेशानंतरही मुलींच्या संगोपनासाठी एक पैसाही दिला नाही”, असा आरोप केला. मात्र, नितीश यांनीही या आरोपावर पलटवार करत हा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता या दोघांसंबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नितीश यांच्या संपत्तीच्या विक्रीसाठी स्मिताने न्यायालयाकडे मदत मागितली, असल्याचं समोर आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्मिता भारद्वाज यांनी नितीश भारद्वाज यांनी दिलेल्या वचनानुसार त्यांच्या दोन मुलींसाठी प्रत्येकी १०,००० रुपये प्रति महिना वसूल करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याला सामान्य भाषेत ‘डार्क घोस्ट’ म्हणतात. सूत्राने असेही सांगितले की ‘कोर्टाने वचनबद्धतेची रीतसर नोंद केली आहे, त्या आधारावर अंतिम आदेश घोषित करण्यात आला आहे”. स्मिता भारद्वाज यांनी नितीश भारद्वाज यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि घरातील जुन्या वस्तू विकण्यासाठी न्यायालयाची मदत मागितली आहे, जेणेकरून ती रक्कम त्यांच्या मुलींच्या पालनपोषणासाठी वापरता येऊ शकते. स्मिताचे वकील चिन्मय वैद्य म्हणाले, “मी एवढेच सांगू शकतो की, कौटुंबिक न्यायालयात डार्कहोस्ट दाखल करण्यात आला आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर भाष्य करू शकत नाही”.
यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांच्या पत्नी स्मिताने सांगितले होते की, “नितीश हे पैशांसाठी दबाव टाकत होते. मी नोकरी सोडली तर आमचा विवाह टिकू शकेल, अन्यथा घटस्फोटासाठी मला पैसे द्यावे लागतील, असा विचार करून ते माझ्यावर पैशांसाठी दबाव आणत आहेत”. स्मिताचा आरोप आहे की, “ते २०१६पासून गुप्तपणे आमचे संभाषण रेकॉर्ड करत आहे. त्याची ही कृती पाहून मला धक्काच बसला”.