Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar In A Relation : मराठी मालिकाविश्वात असे अनेक कलाकार मंडळी आहेत जे लग्नबंधनात अडकत आहेत. सोशल मीडियावर या कलाकार मंडळींच्या लग्नाचे फोटो समोर आले. नुकतीच ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. याशिवाय ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकरही रील स्टार सोनाली गुरवसह लग्नबंधनात अडकला. तर शाल्व किंजवडेकर, शिवानी सोनार ही कलाकार मंडळी काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. यापाठोपाठ आता मालिकाविश्वातील आणखी एक चेहरा रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं आहे.
‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडने नुकतीच सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने रिलेशनशिप मध्ये असल्याची थेट कबुली या पोस्टद्वारे दिली आहे. इतकंच नव्हे तर होणाऱ्या बायकोचा फोटोही त्याने शेअर केला आहे. किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसह रिलेशनमध्ये असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवीबरोबरचा थेट फोटो किरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्री मंडळातल्या बैठका होत राहतील. मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’ वैष्णवी कल्याणकर”, असं कॅप्शन देत त्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. तर चाहते मंडळी व कलाकार मंडळी या पोस्टवर किरण व वैष्णवी यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ मध्ये एकत्र काम केले होते. वैष्णवी देखील मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा असून तिने ‘देवमाणूस २’, ‘तू चाल पुढं’, ‘टिकली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. शिवाय ती ‘बांबू’ या चित्रपटातही झळकली. तर ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे किरण गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय किरणने चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता किरण व वैष्णवी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.