सध्या सगळेचजण गरमीमुळे हैराण झाले आहेत. संपूर्ण देश उष्णतेमुळे वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. या वाढत्या तापमानात काम करणेही कठीण होऊ लागलं आहे. इतकंच नव्हेतर लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या उष्णतेमुळे सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रिटीही हैराण झाले आहेत. मुंबईत ‘मंगल लक्ष्मी’ या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान दीपिका सिंगच्या डोळ्यात गुठळी झाली होती. या शोच्या शूटिंगदरम्यान दीपिकाच्या डोळ्याला अचानक खाज सुटली आणि जळजळ होऊ लागली. जेव्हा तिच्या सहकलाकाराने पाहिले तेव्हा तिच्या उजव्या डोळ्यात रक्ताची गुठळी तयार झाली होती. (Dipika Singh Eye Clot)
याचा खुलासा खुद्द दीपिकाने केला आहे. तसंच शूटिंगदरम्यान तिला या क्लॉटमुळे खूप त्रास होत आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दीपिका म्हणाली, “अर्ध्या तासात मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर मला ताबडतोब औषधे घेण्यास आणि डोळ्यात ड्रॉप टाकण्यास सांगितले”. दीपिकाने सांगितले की, तिचा डोळा खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आणि डोळा बरे होण्यासाठी ५ दिवस लागतील. मला माझ्या डोळ्यांवर जास्त ताण देण्यास मनाई करण्यात आली आहे, विशेषत: शूटिंग दरम्यान ग्लिसरीन वापरण्यास मनाई केली आहे”.
दीपिका पुढे म्हणाली, “माझ्याकडे रडण्यासाठी अनेक सीन आहेत आणि एक अभिनेत्री म्हणून बहुतेक भावना आपल्या डोळ्यांतून व्यक्त होतात. गुठळी माझ्या उजव्या डोळ्यात आहे म्हणून आम्ही बहुतेक शूट डाव्या प्रोफाइलमधून घेत आहोत. याचा शूटवर परिणाम होत आहे पण शो सुरुच आहे. डोळ्यातील गुठळ्यामध्ये उष्णतेने सर्वात मोठी भूमिका बजावली. मी इतकी वर्षे शूटिंग करत आहे, आणि अशा समस्यांना कधीच सामोरे जावे लागले नाही. मी मड आयलंडमध्ये शूटिंग करत होते आणि तापमान खूप जास्त होते, त्यामुळे शरीराने त्यावर प्रतिक्रिया दिली.
पुढे ती म्हणाली, “शोमध्ये एक वेडिंग ट्रॅक सुरु आहे आणि मी प्रत्येक सीनमध्ये आहे, त्यामुळे मी आरामही करु शकत नाही. मी लिक्विड डाएटवर लक्ष केंद्रित करुन स्वतःची काळजी घेत आहे. माझ्या आहारात नारळ पाणी, ताक, इलेक्ट्रोलाइट्स यांचा समावेश आहे. आणि चहापासून मला दूर राहण्यास सांगितले आहे. जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर नसते तेव्हा मी डोळे मिटून बसते”. दीपिका सिंह दीर्घ काळानंतर मालिकाविश्वात परतली आहे. ‘मंगल लक्ष्मी’ या शोमध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे.