Suraj Chavan Facts : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला एक साधा मुलगा ज्याच्याकडे ना पैसे होते, ना ओळख पण होता तो प्रचंड जिद्दी आणि स्वतःच्या टॅलेंटवर असलेला विश्वास. हाच मुलगा पुढे जाऊन Bigg Boss Marathi सारखा मोठा रिअॅलिटी शो जिंकतो ही गोष्ट आहे सुरज चव्हाणच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या ‘मोडवे’ या छोट्याशा गावात सुरज चव्हाणचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य अत्यंत कठीण होतं. घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. आणि त्यामध्ये लहान वयातच त्याच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. या मोठ्या धक्क्यातून त्याची आईही सावरू शकली नाही. मानसिक तणावामुळे तिची तब्येत खालावली आणि काही काळातच तिचंही निधन झालं. दुर्दैव इतकंच थांबलं नाही तर सुरजच्या आई आणि आजीचं निधन एकाच दिवशी झालं.
आई-वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सुरज आणि त्याच्या पाच बहिणींवर मोठं संकट ओढावलं. घर चालवण्यासाठी कोणताही स्थिर आधार नव्हता. त्यामुळे सुरजला लहान वयातच जबाबदारी घ्यावी लागली. शिक्षणाकडे लक्ष देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याने आठवीपर्यंतच शिक्षण घेतलं आणि त्यानंतर शाळा सोडली. यानंतर सुरू झाला त्याच्या आयुष्यातील खरा संघर्ष. रोजंदारीवर शेतात मजुरी करणं, बांधकामावर काम करणं, दिवसाला फक्त 300 रुपये मिळवण्यासाठी तो दिवसभर कष्ट करत होता. अशा परिस्थितीत मोठं स्वप्न पाहणंही कठीण होतं. पण सुरजने कधीच हार मानली नाही. याच काळात त्याच्या आयुष्यात एक नवं वळण आलं ते म्हणजे सोशल मीडियाचं. सुरुवातीला दुसऱ्याच्या मोबाईलवर त्याने TikTok वर छोटे-छोटे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. त्याची स्टाईल वेगळी होती गावाकडची भाषा, साधेपणा आणि भन्नाट कॉमेडी हेच त्याला जमायचं. मात्र सुरुवातीला त्याला लोकांच्या टीकेलाच सामोरं जावं लागलं. “काय वेड्यासारखं करतोय”, “याला काही कामधंदा नाही का?” अशा अनेक टोमण्यांना त्याला सामोरं जावं लागलं. याचसोबत त्याला ट्रोल ही केलं जायचं. पण त्याने कधीच हार मानली नाही. (Suraj Chavan Facts)
आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात विवाहसोहळा संपन्न; लुकने वेधलं लक्ष, फोटो समोर
सुरजने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो सातत्याने व्हिडीओ बनवत राहिला. आणि एक दिवस त्याचा एक व्हिडीओ अचानक व्हायरल झाला. त्या एका व्हिडीओने त्याचं आयुष्य बदललं. “बुक्कीत टेंगुळ” आणि “झापूक झुपुक” सारखे त्याचे डायलॉग्स लोकांच्या तोंडावर आले. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये तो लोकप्रिय झाला. सुरजच्या व्हिडिओंना लाखो views मिळू लागले. त्याची ओळख ‘रील स्टार’ म्हणून निर्माण झाली. मेहनतीने त्याने स्वतःचा मोबाईल घेतला आणि सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाला. काही काळाने TikTok बंद झालं, पण त्याने हार मानली नाही. त्याने Instagram आणि YouTube वर नवीन सुरुवात केली आणि तिथेही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.हळूहळू सुरजची लोकप्रियता इतकी वाढली की त्याला विविध कार्यक्रमांसाठी आणि ब्रँड प्रमोशन्ससाठी ऑफर्स येऊ लागल्या. कधीकाळी दिवसाला 300 रुपये कमावणारा सुरज आता एका इव्हेंटसाठी हजारो रुपये मानधन घेऊ लागला. याच लोकप्रियतेमुळे त्याला आयुष्यातली सर्वात मोठी संधी मिळाली Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात सहभागी होण्याची. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला अनेक स्पर्धकांनी त्याला कमी लेखलं. त्याच्या या निर्णयाला घरातील सदस्यांनी कधीच महत्व दिलं नाही. पण बाहेरच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या सुरजसाठी हे सगळं नवीन नव्हतं. (Suraj Chavan Facts)
आणखी वाचा – आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर केली अन्…
त्याने घरात कोणताही दिखावा केला नाही. ना कोणती बनावट इमेज तयार केली. तो जसा आहे तसाच राहिला, साधा, सरळ आणि प्रामाणिक. हाच त्याचा सर्वात मोठा गुण ठरला. प्रेक्षकांना त्याचा हा खरा स्वभाव खूप आवडला. शो पुढे जात असताना सुरजची लोकप्रियता आणखी वाढतच गेली. त्याच्या प्रामाणिक खेळामुळे आणि साधेपणामुळे तो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक बनला. शेवटी, प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर त्याने ‘बिग बॉस’ मराठी सीझन 5 चा किताब जिंकला. आज सुरज चव्हाण फक्त एक रील स्टार नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे. त्याच्या आयुष्यातील यशानंतर आणखी एक आनंदाची बातमी त्याच्या आयुष्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी त्याला एक आलिशान घर बांधून दिलं, ज्यामुळे सुरज चव्हाणला स्वतःचं हक्काचं घर मिळालं. ही त्याच्या संघर्षाला मिळालेली मोठी दाद होती. यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे क्षण आले. लहानपणापासूनच त्याची प्रियसी असलेल्या संजनासोबत त्याने लग्नगाठ बांधली आणि आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. सूरज चव्हाणच्या प्रवासाने आपल्याला शिकवल, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि स्वतःवर विश्वास असेल, तर यश नक्की मिळतं. साध्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आणि म्हणूनच सुरज चव्हाण ही केवळ एक नाव नाही, तर संघर्षातून उभं राहिलेलं यशाचं उदाहरण आहे. (Suraj Chavan Facts)





