टेलिव्हिजनवरील लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो ‘डान्स प्लस प्रो’ने चांगलीच हवा केली. या रिऍलिटी शोने अनेक गरजूंना उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला. अनेकांच्या आयुष्याला या रिऍलिटी शोने कलाटणी दिलेली पाहायला मिळाली. अशातच या डान्स रिऍलिटी शोचा विजेता समोर आला आहे. छत्तीसगडच्या रितेश पाल या स्पर्धकाने या शोचे विजेतेपद पटकावले आहे. रितेश हा शक्ती मोहनच्या डान्स टीमचा स्पर्धक होता. रितेशने या शोच्या अंतिम फेरीत राकेश साहू व अमन-कुणाल यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. (Dance Plus Pro winner)
या रिऍलिटी शोच्या ट्रॉफीबरोबरच रितेशला १५ लाख रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली. या रिऍलिटी शोचा पहिला रनअप राकेश साहू ठरला. ज्याला ५ लाख रुपयांचा चेक मिळाला होता. तर अमन-कुणाल हे दुसरे उपविजेते ठरले. त्यांनाही ५ लाख रुपयांचा चेक मिळाला. तर विजेतेपद पटकावलेल्या रितेशसह उपविजेत्यांचंही सगळेचजण भरभरुन कौतुक करत आहेत.
शक्ती मोहन यांनी रितेशचे त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिने लिहिले आहे की, “ज्या क्षणाची मी वाट पाहत होते तो क्षण आला आहे. हा एक आश्चर्यकारक धक्का आहे. यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मी रितेशचे अभिनंदन करु इच्छिते. रितेशने आपल्या डान्सिंग स्टाईलने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे”, असं तिने या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
या रिऍलिटी शोच्या विजेतेपदाची घोषणा सुप्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझा यांनी केली. विजेतेपदाचं नाव ऐकताच रितेश खूप भावूक झाला. हा शो तो जिंकला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. रितेश हा अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने सलॉनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याला त्याच्या नृत्याची आवड काही शांत बसू देत नव्हती. सलॉनमध्ये काम करता करता तो डान्सही करायचा. त्याने आपल्या मेहनतीने व झोकून देऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे.