Comedian Kunal Kamra Song On Eknath Shinde : सुप्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने एक गाणं तयार केलं. कुणालने हे गाणं त्याच्या एका शोमध्ये गायलं. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामुळे राज्यभरामधून संताप व्यक्त होत आहे. कुणालने गाण्यामधून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला आहे. त्याचं हे गाणं ऐकल्यानंतर राजकीय मंडळीही संताप व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण कुणाल कामरा नक्की कोण?, त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेलं गाणं नक्की काय? हे आपण जाणून घेऊयात. (Kunal Kamra Controversy)
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेलं गाणं कोणतं?
२३ मार्च (रविवारी) कुणालचा मुंबईमध्ये शो होता. त्याच्या शोला हाऊसफुल्ल गर्दी होती. उपस्थित प्रेक्षकांबरोबर संवाद साधताना कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान त्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर टिप्पणी केली. त्यानंतर ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील गाण्याची चाल लावून एकनाथ शिंदेंवरील गाणं म्हटलं. हे गाणं ऐकून उपस्थितांनाही हसू अनावर झालं.
ऐका कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेलं गाणं
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखो में चश्मा हाये…
एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छिप जाए…
मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए…
जिस थाली में खाए उसमेंही छेद कर जाए…
अशा प्रकारचं गाणं कुणालने त्याच्या शोमध्ये सादर केलं. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या गाण्यामध्ये त्याने उल्लेख केला. शिवाय शिवसेना पक्षाचाही उल्लेख करत एकनाथ शिंदे यांचा अपमान केला. हे गाणं ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली.
राजकीय मंडळींचा संताप
राजकीय क्षेत्रातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिय समोर येत आहेत. काही राजकीय मंडळींनी कुणाल समोर आल्यास त्याला काळं फासण्याची धमकी दिली आहे. “कोणीही कितीही दबाव आणला तरी कडक कारवाई होईल. सुपारी घेऊन कोणी अपमान करत असेल तर कारवाई होणारच. रणवीर अलहाबादियालाही आम्ही सोडंल नाही”, अशा कठोर शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच निलेश राणे यांनी “कुणाल कामरा दिसला तिथे फटके टाकणार” असं म्हटलं आहे. तर आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी कुणालला पाठिंबा दर्शवला आहे.
कोण आहे कुणाल कामरा?
कुणाल जय हिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. कॉमर्स शाखेमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. मात्र कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच त्याने शिक्षण बंद केलं. त्यानंतर प्रॉक्शन कंपनीमध्ये ११ वर्ष काम केलं. २००१३मध्ये त्याने स्वतःचे स्टॅडअप कॉमेडी शो करण्यास सुरुवात केली. युट्यूबमध्ये त्याचे मिलियनच्या घरात सब्स्क्रायबर्स आहेत. कुणाल तब्बल १७ कोटी रुपयांचा मालक आहे. आता पुढे कुणालचा शो, चॅनल याचं काय होणारं? हे पाहावं लागेल.