‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची सर्वचजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आणि वादग्रस्त कार्यक्रम यापैकी हा एक शो आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस’चा हा प्रोमो पाहून साऱ्यांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये नेमके कोणते कलाकार झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Bigg boss Marathi New Entry)
अशातच काल ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन दोन प्रोमो समोर आले आहेत. हे प्रोमो येत्या २८ तारखेला होणाऱ्या ग्रँड प्रीमियरची झलक दाखवत आहेत. समोर आलेल्या दोन प्रोमोंपैकी एका प्रोमोमध्ये झळकणार सदस्य कोण? आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. या सुरांच्या बादशाहमुळे घरातील राधा बावऱ्या होणार आहेत असं चित्र दिसत आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात दिसणारा हा पहिला सदस्य गायक असल्याचं कन्फर्म झालं आहे. इतकंच नव्हे तर तो अभिजीत सावंत असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.
तर दुसऱ्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. हटके फॅशनने समृद्ध करणारं तिचं व्यक्तीमत्त्व, किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा या आत्मविश्वाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणार का?, ग्लॅमरस परदेसी गर्ल नेमकी कोण आहे याचे नेटकरी अनेक तर्क वितर्क लावत आहेत.
दरम्यान, येत्या २९ जुलैपासून ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व बघायला मिळणार आहे. रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर ‘बिग बॉस’ हा शो बघता येणार आहे. रितेश देशमुखला ‘बिग बॉस’ मराठीच्या या नव्या पर्वात आपली छाप सोडता येणार का? तो या शोमध्ये काय नावीन्य आणणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय स्पर्धक म्हणून कोणते कलाकार दिसणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.