‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोचे जगभरात लाखो चाहते आहेत. या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या शोमधील एका पात्राबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इन्स्पेक्टर फ्रेडरिक उर्फ दिनेश फडणीस यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या हा अभिनेता मृत्यूशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. आजवर दिनेश फडणीस यांनी सिनेसृष्टीत बऱ्याच महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (CID fame Dinesh Phadnis Heart Attack)
मीडिया रिपोर्टनुसार,’सीआयडी’चे निरीक्षक फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनेश फडणीस सध्या व्हेंटिलेटरवर असून ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत. दिनेश फडणीस ५७ वर्षांचे आहेत. शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असल्याचं समोर आलं आहे.
‘सीआयडी’मध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टी यांनीही दिनेश फडणीस यांच्या आरोग्याबाबतचे अपडेट दिले आहेत. दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, “त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी बरी झाली आहे. त्याचे शरीर उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. तो लवकर बरा होऊन घरी परतावा, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत” असं ते म्हणाले. दिनेश फडणीसबाबतची ही धक्कादायक बातमी ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
९०च्या दशकातील लोकप्रिय शो ‘सीआयडी’ आजही लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. या शोमध्ये दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दर्शविली होती. दिनेश फडणीस यांनी अनेक वर्षे ‘सीआयडी’मध्ये काम केले आहे. याशिवाय ते ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्येही दिसले आहेत. दिनेश गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले पाहायला मिळाले.