छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे अक्षरा व अधिपती यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेत अक्षरा-अधिपतीचा शाहीविवाह सोहळा संपन्न झाला. मालिकेतील या जोडीला जितकं प्रेम मिळतं आहे तितकंच प्रेम मालिकेतील इतर कलाकारांनाही मिळत आहे. या मालिकेतील अक्षरा हे पात्र शिवानी रांगोळे साकारत आहे. तिची ही भूमिका चाहत्यांच्या बरीच पसंतीस पडताना दिसते. शिवानीचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहे. ती आपले व्हिडिओ व फोटो चाहत्यांना शेअर करताना दिसते. नुकताच तिने तिचा जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.(shivani rangole shared 5th standard work video)
शिवानीने अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. तिने अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात जाग मिळवली. तिचा असाच एक लहानपणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. हा व्हिडीओ डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘उपनिषद गंगा’ या मालिकेतील आहे. यात ती तिच्या वडिलांकडून गणिताचे धडे घेताना दिसते.
आणखी वाचा – गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?
हा व्हिडिओ शेअर करत शिवानी इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने लिहिलं, ‘माझं लहानपणीचं काम अचानक इन्स्टाग्रामला दिसू लागलं. मला खूप लोकांनी विचारलं की, ही तूच आहेस का? गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ. चंद्रप्रकाश व्दिवेदी यांच्या उपनिषद गंगा नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप’, असं लिहीत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला.
या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक व कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने, ‘तुझं रुप व बोलणं इतकं निरागस आहे की ती तू आहेस हे लगेच ओळखू येत आहे’, असं म्हणत तिच्या बालपणीच्या रुपाचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘खरंच खूप छान. तू आहेस तशीच दिसतेस’, असं लिहित तिचं कौतुक केलं.