Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवार ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवल आणि अखेर या शोची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांची मनंदेखील जिंकली. ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Boss Marathi 5 Suraj Chavan Winner)
बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकताच सूरजवर राजकीय क्षेत्रातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो”.
तसेच रुपाली चाकणकर यांनीही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. रुपाली यांनी सूरजचा फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील बारामतीचा सुरज चव्हाण यंदाच्या मराठी बिग बॉस स्पर्धेचा विजेता ठरला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. दुनियेच्या झगमगाटात आपल्यातील जिद्दीचा व साधेपणाचा प्रकाश नेहमीच उठून दिसतो हा संदेश सुरजने संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या उज्वल यशाबद्दल सुरज चव्हाणचे हार्दिक अभिनंदन व यापुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा”. याशिवाय अमोल कोल्हे, अजित पवार, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोळे यांनीही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. तसेच केदार शिंदेंनी त्याला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणादेखील केली आहे. दरम्यान, सूरजच्या या विजयावर बिग बॉसच्या घरातील व घराबाहेरील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.