Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर टिक टॉक स्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणने नाव कमावलं. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यंदाची ही ट्रॉफी बारामतीत गेली असल्याने साऱ्या महाराष्ट्राला खूप आनंद झाला असल्याचे पाहायला मिळतेय. सूरज ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर ही सूरज चव्हाणचं विजेता व्हायला हवा असा नारा प्रेक्षकांनी लगावलेला दिसला आणि त्याप्रमाणे सर्वाधिक वोट मिळवत सूरज चव्हाण यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वाचा विजेता ठरला. तर रनर अप म्हणून अभिजीत सावंतचं नाव पुढे आलं.
सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याला यंदाची ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी तर मिळालीच याशिवाय २४ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कमही त्याने पटकावली. इतकंच नव्हे तर त्याला एक सुंदर अशी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून डायमंड ज्वेलरी देखील मिळाली. तसेच त्याला विजेता होताच एक सुंदर अशी इलेक्ट्रिक स्कूटरही भेट म्हणून मिळाली. अशा अनेक बक्षीसांचा वर्षाव सूरजवर झालेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – मोठी घोषणा! केदार शिंदे सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार, ‘झापूक झुपूक’ असणार नाव
सूरजला सोशल मीडियावर भरभरुन पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला आणि आता सूरज केदार शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समोर आले आहे. खुद्द केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात याबाबतची घोषणा केली असल्याचे समोर आले आहे. ‘झापूक झुपूक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आलं आहे.
विजेता झाल्यानंतर सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार, माझी जिद्द होती आणि माझा विश्वास होता आणि टी ट्रॉफी मी जिंकली आहे. ॐ नम: शिवाय, आई मरी माता, हर हर महादेव, मला माहीत होतं अभिदादा माझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार”. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे.