Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. एकूण १६ जणांच्या एन्ट्रीने सुरुवात झालेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अवघ्या सहा जणांवर येऊन ठेपला. (Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)
अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. विजेता झाल्यानंतर सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार, माझी जिद्द होती आणि माझा विश्वास होता आणि टी ट्रॉफी मी जिंकली आहे. ॐ नम: शिवाय, आई मरी माता, हर हर महादेव, मला माहीत होतं अभिदादा माझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार”. विजेता झाल्यानंतर सूरजला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. त्याला घेऊन चित्रपट करणार असल्याचेही केदार शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे साहजिकच सूरजच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे.