मराठी मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नुकतंच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कलाकारांच्या ग्रेडवर तसंच त्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर आपलं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर सविता यांनी मराठी इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा मिळण्याबद्दलही भाष्य केलं. (Savita Malpekar on Marathi Artist Pension)
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “इथे कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. तेव्हा (उद्धव ठाकरे) यांच्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आम्ही काही मंडळी अजितदादांकडे गेलो होतो. तेव्हा आपल्या मराठी इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा नाही याबद्दल विचारायला गेलो होतो. तसंच कलाकारांच्या पेन्शनसाठी गेलो होतो. नाट्यपरिषदेचा एक पदाधिकारी अमित देशमुख सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या पेन्शनसाठी विचारायला गेला होता. तेव्हा त्याने सांगितलं की मी त्यांना A ग्रेड, B ग्रेडनुसार कलाकारांना पेन्शन मिळाले पाहिजे असं म्हटलं. यावर मी त्यांना असं म्हटलं की ही ग्रेड ठरवणारा तू कोण आहेस? वर्गवारी कसली करता, जर द्यायचे असतील तर सरसकट द्या”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “माझं म्हणणं असं आहे की जे स्वत:ला A ग्रेडचे कलाकार समजतात त्यांनी पेन्शन घ्यावीच का? त्यांना गरज नाही मग त्यांना दहा हजार रुपये कशाला पाहिजेत. याच मागणीसाठी आम्ही अजितदादांकडे गेलो आणि सांगितलं की कलाकारांची ही ग्रेड बंद करा. ग्रेड ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहोत? एकतर १,३०० आणि २,७०० रुपये देत आहात आणि या पैशात चार दिवसांची औषधे पण येणार नाहीत. त्या वृद्ध कलाकारांना निदान इतकी पेन्शन तरी द्या, ज्यात त्यांची महिन्याचे औषधे येतील”.
यापुढे सविता यांनी असं म्हटलं की, “मी अजित दादांना म्हटलं की, ‘किमान २० हजार रुपये तरी द्या’. यावर अजित दादा असं म्हणाले की, ‘खरंच आम्हाला लाज वाटते की, इतकी कमी पेन्शन मिळते पण तिजोरीत खडखडाट आहे. मी कबूल करु शकत नाही. पण यापेक्षा कमी देणार नाही हे सांगतो’. त्यानंतर २०२१ च्या अध्यायदेशात सर्वांना सरसकट पेन्शन देण्याचे नमूद करण्यात आले”.