‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’शिवाय ‘टाइमपास’, ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही भाऊ कदम झळकले आहेत. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या आहेत, या शोमधील त्यांच्या भूमिका व विनोदी अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे भाऊ कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. (Bhau Kadam Fan Meet)
सोशल मीडियावर भाऊ कदम आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यानी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भाऊ कदम यांनी आजवर अनेक विनोदी व गंभीर भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. अनेकजण त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. अशातच त्यांनी एका वयस्कर प्रेक्षकांच्या भेटीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य भाऊ कदम यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक आहेत आणि भाऊ कदमही त्यांना आनंदाने फोटो देत आहेत. तसंच भाऊ कदम हे त्यांची विचारपुसही करत आहेत. तसंच भाऊ कदम यांना व्हिडीओतील महिला त्यांच्या घरी येण्याची विचारणा करतात आणि त्यावर भाऊ कदमही त्यांना होकार देतात. भाऊ कदम यांची सहकलाकार. अभिनेत्री श्रद्धा हांडेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. भाऊ कदमांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? पाच वर्षांनी सांगितले नेमकं कारण, म्हणाले, “राजकीय…”
दरम्यान, भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत भाऊ कदम यांच्या कृतीचे कौतुक केलं आहे. “मीसुद्धा भाऊ कदम यांना भेटलो आहे, ते खूपच छान व्यक्ती आहेत. गणपती बाप्पावर तुमचा कायम आशीर्वाद राहो”, “भाऊ कदम अशीच माणुसकी राहूदे. तुम्ही आयुष्यभर असंच हसत रहा”, “कलियुगातील माझा आणि मी ओळखलेला देव माणूस” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.