पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझसाठी २०२४ हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण ठरलं आहे. या वर्षी त्याने संपूर्ण भारतभरात अनेक कॉन्सर्ट केले होते. त्याच्या सगळ्याच कॉन्सर्टसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेलीदेखील बघायला मिळाली. मात्र काही राज्यांमध्ये त्याच्या कॉन्सर्टवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये त्याच्या दारु व ड्रग्स असे शब्द असलेल्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली. अनेक कलाकारांनी हे चुकीचं असल्याचा दावादेखील केला. नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील दिलजीतला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आता यामध्ये एक नवीन कलाकार दिलजीतला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावला आहे. (yo yo honey singh on diljit dosanjh)
सध्या बॉलिवूड व पंजाबी गायक, रॅपर हनी सिंह त्याच्या डॉक्युमेंट्रीमुळे खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. त्याने आता दिलजीतला पाठिंबा देत एक वक्तव्य केले आहे. हनी म्हणाला की, “ते दारुची दुकानं बंद नाही करत आहेत. ते राज्यांना दारुमुक्त करत आहेत आणि नंतर भारताला दारुमुक्त करतील. त्यानंतर आपण या विषयावर बोलू शकतो”. नंतर तो म्हणाला की, “आम्ही नक्कीच या अभियानामध्ये सहभागी होऊ. आम्ही लस्सी, ताक व जलजिरा याबद्दल गाणी लिहू”.
तसेच यानंतर हनीला विचारले गेले की, त्याच्या ‘चार बोटल वोडका’ हे गाणं बदलायला सांगितलं तर काय करणार? त्यावर हनीने उत्तर दिले की, “मग गाणं फक्त एका ट्यूनवरच चालेल. आजकाल दारु हा शब्द ओघा ओघात रोज वापरला जातो. सगळ्या पार्टीमध्ये दारुचा समावेश असतो. दारुची संस्कृती फक्त पंजाबमध्ये नाही. आपण लग्नात जातो, कार्यक्रमांना जातो तेव्हा दारु प्यायली जाते. त्यामुळे ही पंजाबी संस्कृती असल्याचे बोलू नये”, असंही तो म्हणाला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी कॉन्सर्टमधील अटी व नियमांवरुन केलेल्या भाष्यामुळे दिलजीत चर्चेत आला होता. तो म्हणाला की, “जर सगळ्या राज्यांनी दारुच्या विक्रीवर बंदी घातली तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही दारुचा उल्लेख असलेली गाणी गाणार नाही”. दिलजीतचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते.