‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेतून शाल्व किंजवडेकर हा अभिनेता घराघरात पोहोचला. त्याच्या अभिनयाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला बघायला मिळतो. शाल्व मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कॉस्ट्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट श्रेया डफळापूरकरबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख निवडला होता. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. अशातच आता दोघे अखेर विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अशातच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (shalva kinjawadekar and shreya daflapurkar gruhpravesh)
शाल्व व श्रेया यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळाले. नुकताच दोघांचाही गृहप्रवेशाचा व्हिडीओ बघायला मिळत आहे. यामध्ये श्रेयाने सुंदर अशी लाल-गुलाबी अशा रंगाची आणि त्यावर सोनेरी नक्षीकाम असलेली साडी नेसली आहे. तसेच शाल्वने निळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा व सोनेरी रंगाचा दुपट्टा घेतला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच घराला केलेली सुंदर अशी सजावट दिसून येत आहे. तसेच दारात फुलांची आरास केलेली दिसून येत आहे. त्यानंतर दारात आल्यानंतर श्रेया व शाल्व उखाणा घेतात. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खूण, शाल्वचं नाव घेते किंजवडेकरांची सून”, असा उखाणा श्रेया घेते.
त्यानंतर शाल्व उखाणा घेत म्हणतो की, “लग्न झालं आहे मस्त, ओलांडणार आहे माप, बायको म्हणून तू आता मला हवं तेवढं काप”. दरम्यान शाल्वचा उखाणा यावेळी जास्तच हटके असलेला दिसून आला. उखाणे घेतल्यानंतर श्रेया माप ओलांडून घरी येते. आरती करुन तिचे नव्या सुनेचे घरात आगमन होते. त्यानंतर दोघंही घरातील देव्हाऱ्यासमोर देवाचे आशिर्वाद घेतात. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळालेली दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शाल्वच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्नसमारंभाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन समोर आले. शाल्व आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली.