प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य नेहमीच आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अभिजीतने एक हजारहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. अभिजीत त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असतो. अभिजीत भट्टाचार्य नुकताच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर दिसला. यावेळी त्याने त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोकळेपणाने भाष्य केलं आहे. अशातच त्याने एक दावा करून वाद निर्माण केला आहे. संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षाही श्रेष्ठ होते. तसंच त्याने महात्मा गांधींना भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिताही म्हटलं आहे. (Abhijeet Bhattacharya Controversial Statement on Mahatma Gandhi)
अभिजीत भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “भारत पूर्वीपासून अस्तित्वात होता, पाकिस्तान नंतर भारतापासून वेगळा झाला. पाकिस्तानच्या अस्तित्वाला ते जबाबदार होते. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटले गेले.” तसंच “आरडी बर्मन हे संगीत जगतात राष्ट्रपिता होते आणि ते महात्मा गांधींपेक्षा मोठे होते”. गायकाच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना फटकारले आहे.
यावर अनेकांनी टीका करत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिजीतच्या या वक्तव्यावर अनेक नेटकरी संतापले आहेत. अभिजीतच्या या वक्तव्यावर एकजण म्हणाला की, ‘ते राष्ट्रपिता होते की नाही हे ठरवणारा तू कोण?” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “अभिजीतकडून चांगल्या विधानांची अपेक्षा नाही. खुर्चीवर बसून हे लोक फालतू विधानं करत असतात”.
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अभिजीतच्या या व्यक्तव्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांनी बॉलीवूडच्या स्टार कलाकारांवरही निशाणा साधला आहे आणि वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. गायकाने सर्वप्रथम त्याला विषय बदलण्यास सांगितले. यानंतर तो म्हणाला, “सलमान खान अजूनही त्या स्तरावर आला नाही की मी त्यांच्याबद्दल चर्चा करू शकतो”.