Nupur Shikhare Ira Khan Anniversary : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान तिच्या लग्नामुळे बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. आयरा खानने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ही जोडी २०२४ मध्ये विवाहबंधनात अडकली. दोघांनी ३ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. आणि त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी उदयपूरमध्ये कुटुंबीय व मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. आज दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच दोघांनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, नुपूरच्या लग्नाला वर्ष पूर्ण होताच शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
नुपूरने ‘आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी’ या गाण्यावर रील व्हिडीओ बनवत पोस्ट केलं आहे. या व्हिडीओमध्ये नुपूर शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन आयराबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहे. “माझ्याशी लग्न करायचं धाडस दाखवण्यासाठी आणि एक संपूर्ण वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, मी माझी मिसेस सौ आयरा खान हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करतो”, असं कॅप्शन नुपूरने व्हिडीओला दिलं आहे.
दोघांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं असून नुपूरने मराठी गाण्यावर हटके रील बनवत बायकोला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नुपूरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी व कलाकार मंडळींनी हटके कमेंटचा वर्षाव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. क्रांती रेडकर, श्रेया धन्वंतरी, सिद्धार्थ मेनन, झेनमेरी, कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर या कलाकार मंडळींनी नुपूरच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.
आयरा खान मात्र आजवर इतर स्टार किड्सप्रमाणे आलिशान जीवनशैली पासून दूर राहिली. परदेश दौरा, आलिशान राजवाड्यासारखे घर आणि शाही थाटामाट, उच्च राहणीमान असं आलिशान जीवन आमिर खानच्या लेकीने जगलं नाही. मात्र आता लग्नानंतरही आयराने साधे जीवन जगण्याकडे अधिक भर दिलेला पाहायला मिळाला. लग्नानंतरही ती साधे जीवन जगत आहे आणि ज्यात ती आनंदी आहे. आयराने सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह लग्नगाठ बांधली.