आमिर खान व जिनिलीया देशमुखचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे जिनिलीया ‘सितारे जमीन पर’मधून बऱ्याच वर्षांनी बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. रितेश देशमुखसह तिने २०१२मध्ये लग्न केलं. त्यानंतर जिनिलीया संसारातच रमली. रियान व राहिल अशी दोन मुलं जिनिलीयाला आहेत. त्यांच संगोपन करण्यासाठी तिने घरीच राहणं पसंत केलं. मात्र गेल्या काही वर्षात तिची इच्छा असूनही चांगल्या भूमिका जिनिलीयाला ऑफर झाल्या नाहीत. याचविषयी तिने पहिल्यांदाच उघडपणे खंत व्यक्त केली. बॉलिवूडने चांगल्या भूमिका ऑफरच केल्या नसल्याचं तिचं मत आहे. (genelia deshmukh talk about Bollywood)
फिल्मी मंत्रला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीया म्हणाली की, “’सितारे जमीन पर’ चित्रपट मी करणार हे सगळ्यांना जेव्हा कळालं तेव्हा मला एकच प्रतिक्रिया आली की, बापरे तू किती नशिबवान आहेस. आमिर खानच्या चित्रपटात तू काम करत आहेस. आमिर सरांची चांगली वृत्ती आहे की, त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं. माझं ऑडिशनही घेतलं. पण तुम्हीही असं करु शकता ना?. तुम्हीही मला ऑडिशन घेऊन कोणती तरी भूमिका देऊ शकता ना?”.
लग्नानंतर बॉलिवूडमधून फारशा भूमिका ऑफर न झाल्याबाबतही जिनिलीयाने खंत व्यक्त केली. यावेळी ती चित्रपटसृष्टी विषयी अगदी खुलेपणाने बोलली. जिनिलीया म्हणाली, “सगळेच नियमांनुसारच पुढे चालत असतात. आता माझं लग्न झालं आहे म्हणून अमूक अमूक भूमिकेची आता मला गरज नाही असं समोरच्याला वाटतं. मला असं वाटतं की, चित्रपट तयार करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता स्वतःच्या मानसिकतेमध्येही बदल करायला पाहिजे”.
पुढे ती म्हणाली, “जर एखाद्या विशिष्ट वयाची भूमिका असेल तर तुम्हाला त्याच वयाच्या व्यक्तीला भूमिका दिली पाहिजे. एखादी भूमिका तुम्ही कलाकाराला दिली आणि त्या भूमिकेपेक्षा तो वयाने लहान असेल तर छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्याकडून राहून जातात. भूमिकेसाठी योग्य तो कलाकार निवडणं गरजेचं आहे. मला अशी आशा आहे की, प्रत्येकाला विविध भूमिका साकारण्याची संधी मिळेल”. लग्नानंतर बॉलिवूडने हवं तसं काम न देण्यावरुन जिनिलीयाने पहिल्यांदाच स्पष्ट मत मांडलं.





