अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. यामुळे सलमानच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सर्व जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोइ गटाने घेतली होती. त्यानंतर सगळ्यांनीच सलमानसाठी आवाज उठवला आहे. याबाबत गायक मिका सिंहदेखील पुढे सरसावला आहे. त्याने मोठ्या कार्यक्रमात एक गाणं गात सलमानला पाठिंबा दर्शवला आहे. त्याच्या या कृत्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान मिकाने नक्की काय केले? नक्की काय घडले? हे जाणून घेऊया. (Mika singh on salman khan)
मिका एका मंचावर परफॉर्मन्स करत होता. यावेळी त्याने संजय गुप्ता यांच्या चित्रपटातील ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ चित्रपटातील गाणं गाऊन सलमानसाठी पाठिंबा दर्शवला. एका व्हायरल व्हिडीओमध्ये मिकाने गाणं खास त्याच्यासाठी गायलं. यासाठी त्याने त्याचा शो मध्येच थांबवला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मिका दिसून येत आहे. तसेच तो म्हणाला की, “सलमान खानसाठी हे वाक्य आहे. भाई मी आहे. तू चिंता नको करुस”. त्यानंतर त्याने गाण्याच्या काही ओळीदेखील गायल्या आणि पुढे म्हणाला, “त्याच्या आईला, बहिणीला सगळ्यांना बघून घेईन. तुझ्या पुढे जो कोणी येईल त्या सगळ्यांना मी सांभाळेन”.
मिकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मिकाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मरुन घेणे”. तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “माफ करा पण RIP मिका भाई”.
मिकाने सलमान खानबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. ‘रेडी’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ या चित्रपटांमध्ये सलमानसाठी गाणी गायली आहेत. दरम्यान लॉरेन्सने दिलेल्या धमकीनंतर सलमान ‘बिग बॉस १८’च्या चित्रीकरणासाठी खूप सुरक्षेसाहित सेटवर आला. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या कुटुंबानेदेखील त्याची सुरक्षा वाढवावी अशी विनंती केली होती.