हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व सगळ्यांची लाडकी अभिनेत्री झीनत अमान या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतात. ती सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो, व्हिडीओ तसेच अनेक जुन्या आठवणी शेअर करत असते. त्यांच्या सुंदर रुपाच्या चर्चा आजही होत असतात. अशातच त्यांनी केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. झीनत यांनी चक्क लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.यामुळे आता त्यांच्या म्हणण्याचा नक्की अर्थ काय आहे यांवर सगळे अनेक तर्क-वितर्क मांडत आहेत. (zeenat aman on live in relationship)
झीनत यांनी आपल्या पाळीव कुत्र्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये आपल्या चाहत्यांना कुत्र्याची ओळखदेखील करुन दिली आहे. त्यानंतर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेल्या मजकुरावर एक प्रतिक्रिया आली त्यावर त्यांनी उत्तरामध्ये लिहिले की, “तुमच्यातील कोणीतरी मला नातेसंबंधाबद्दल सल्ला मागितला. मी आता माझे काही विचार मांडणार आहे. हे विचार माझे स्वतःचे आहेत जे याआधी मी कधीही शेअर केले नव्हते”.
पुढे त्या म्हणाल्या की, “तुमच्यापैकी कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांनी आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावे असा मी सल्ला देईन. मी माझ्या मुलांनादेखील हाच सल्ला दिला आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत”.
झिनत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लग्न करायच्या आधी कुटुंबामध्ये मिसळताना, नाती बनवताना एक परीक्षा घ्यावी. दिवसातील काही तासांसाठी आपण स्वतःला खूप चांगले दाखवू शकतो. पण तुम्ही बाथरुम शेअर करु शकता का?, एकमेकांवरील राग व्यक्त करु शकता का? रोज रात्री जेवण काय बनवावे याबद्दल सहमती असते का? हे माहीत करुन घेणे खूप महत्त्वाचे असते”.
त्या पुढे लिहितात की, “तुम्ही बेडरुममध्ये एकमेकांना किती महत्त्व देतात? छोट्या छोट्या गोष्टींवरुन होणारी भांडणं सोडवू शकतात का? थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का? हे समजणे महत्त्वाचे असते. आपला भारतीय समाज लग्नाआधी एकत्र राहण्याला पाप समजतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला समाज पाप समजतो”.
झीनत यांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. झीनत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या लवकरच अभय देओल व शाबाना आजमीबरोबर ‘बन-टिक्की’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.