सिनेसृष्टीत काम करत असताना बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा ही कलाकार मंडळी ट्रोलिंगवर भाष्य करत नेटकऱ्यांना उत्तर करताना दिसतात तर काही कलाकार मंडळी आहेत जी नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच नव वर्षाचं औचित्य साधत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नेटकऱ्यांना चांगलाच टोला लगावला असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन ही खास पोस्ट केली आहे. आजवर अमृताने मालिका, चित्रपट यांसारख्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (Amruta Khanvilkar On Trollers)
अमृताने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला खडेबोल लगावले आहेत. ही पोस्ट शेअर करत अमृताने म्हटलं आहे की, “आशा करते तुमचा गुढीपाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवी स्वप्ने देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केल आहे तर तुमच्या सारखीच मीसुद्धा आहे. मीसुद्धा हेच केलं. कारण मी ही फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे. मूळची कोकणातील पण जन्म मुंबईचा आहे. मी ही कोणाची तरी मुलगी, बहीण, मावशी, ताई, मैत्रीण, बायको आहे. आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे”.
अभिनेत्री पुढे असंही म्हणाली आहे की, “तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या मुलाखती देत आहे. आता या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते. वेषभूशा असो, हसणं असो, बोलणं असो. एका स्त्रीच्या प्रतेय्क गोष्टी वर किती किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये?. जे लोक स्वतःचं खरं नाव किव्हा साधा डिपीसुद्धा लावत नाहीत असे लोक बोलतात. मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाही. पण यावर जे तुम्ही लिहिता, बोलता यामध्ये फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात”.
शेवटी तिने म्हटलं की, “असो… मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे”.