एक काळ असा होता जेव्हा ‘मायका’ मालिकेतील रोमित राज व शिल्पा शिंदे हे दोघे खऱ्या आयुष्यातील सुंदर जोडींपैकी एक होती. या मालिकेत एकत्र काम केल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केले आणि साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. साखरपुड्यानंतर लग्नाची पूर्ण तयारीही करण्यात आली होती. अगदी पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या, पण लग्नाआधीच त्यांच्या नात्यात दुरावा आला. हे नाते संपवण्याचा निर्णय शिल्पाने घेतल्याचे बोलले जात आहे. अशातच आता रोमित राजनेही त्या नात्याबद्दल भाष्य केल्याचं समोर आलं आहे. यावेळी त्याने “मला शिल्पाबाबत काहीही वाईट ऐकायचे नाही”, असेही म्हटले. (Romit Raj On Shilpa Shinde)
रोमित राजला विचारण्यात आले की, जेव्हाही तुझे नाव येते तेव्हा तुमचं नातं तुटल होतं याची आठवण येते, त्यातून तू काय शिकलास?”. यावर उत्तर देत रोमित म्हणाला, “मी नऊ वर्षे मुंबईत इंडस्ट्रीत होतो आणि मी कोणाला डेट केले नाही. मला वाटते मी शिल्पाला सहा महिने डेट केले. आम्ही दीड, दोन वर्षे हा शो केला असेल, पण जेव्हा त्याने तो शो सोडला तेव्हा मी तिला डेट करण्याचे ठरवले”. टेलीचक्करशी संवाद साधताना तो म्हणाला, “सहा महिन्यांचा एक टप्पा होता जेव्हा आम्ही एकमेकांना डेट केले आणि नंतर आम्ही थांबलो आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्यापूर्वीच नाते संपवले. म्हणजे तिने हे लग्न मोडले असे ती मुलाखतींमध्ये सांगत आहे, ते अगदी खरे आहे. त्यांनी ठरवले की आपण वेगळे होऊ.
अभिनेता पुढे म्हणाला, “मी नेहमी विचार करतो की मी नऊ वर्षे कोणाला डेट केले नाही, मग हा सहा महिन्यांचा टप्पा का आला? हे शक्य आहे की मी टीनाशी लग्न केले असते तर कदाचित हा सहा महिन्यांचा टप्पा आला नसता. कारण मी आणि शिल्पाने दीड वर्ष केलेला मायका हा शो हिट झाला होता. आणि मोठी गोष्ट अशी होती की शिल्पा एक चांगली व्यक्ती आहे. काही ठिकाणी लोक गैरसमज करुन घेतात पण आजपर्यंत १५ वर्षे झाली तरीही आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि मीही माझ्या आयुष्यात आनंदी आहे”.
पुढे तो म्हणाला, “पण आजपर्यंत, जर कोणी माझ्याकडे मुलाखतींमध्ये, मीडियामध्ये येत असेल वा जर कोणी अभिनेता, कोणी मित्र माझ्याकडे येऊन शिल्पाविषयी बोलत असेल, तर मी त्यांना तिथेच थांबवतो. मी ते कधीच मध्ये आणले नाही कारण मला तिच्याबद्दल कोणाकडूनही वाईट ऐकायचे नाही. माझ्याबरोबर जे काही घडलं, तिने जो निर्णय घेतला, तो अगदी बरोबर घेतला आणि आता ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. मला वाटते की, ती खूप हुशार आहे आणि तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला”.