‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने गेल्या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. अभिनेत्याने थेट त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तो गेल्या काही वर्षांपासून क्षितीजा घोसाळकरसह रिलेशनशिपमध्ये होता. आता ही जोडी लवकरच लग्न करणार असून अलीकडेच ‘इट्स मज्जा’वर त्यांचे केळवण पार पडले. यात त्यांनी दोघांच्या रिलेशनविषयी व करिअरविषयी मनमुराद गप्पा मारल्या.
यावेळी क्षितिजाने ती सामाजिक कार्य करणाऱ्या एनजीओमध्ये सध्या काम करत असल्याचे सांगितले. तसेच जैवतंत्रज्ञानमध्ये मास्टर डिग्री पर्यंतचे शिक्षण घेतले असल्याचे सांगितले. याशिवाय एक फॅशन मॉडेल म्हणूनही तिने काम केले आहे. याबद्दल तिने असे म्हटले की, “मी सध्या कोटक एज्युकेशन फाउंडेशन या एनजीओमध्ये सीनिअर कॉर्डीनेटर म्हणून काम करत आहे. या संस्थेअंतर्गत आम्ही गरीब मुलांसाठी काम करतो. गेल्या ७ वर्षात आम्ही सात ते साडेसात हजार मुलांचे शिक्षण व त्यांच्या प्लेसमेंट्सचे काम केले आहे. तर हे शिक्षण क्षेत्रातले सामाजिक कार्य आहे आणि या कामाव्यतिरिक्त मी आवड म्हणून फोटोशूट व मॉडलिंग वगैरे करते.
या सगळ्यात तिला प्रथमेशची साथ कशी मिळते. यावर दोघांनी गप्पा मारल्या. प्रथमेश क्षितिजाला तिच्या करिअरमध्ये आणि कामातून वेळ काढत दोघांचे नाते कशाप्रकारे सांभाळतात, याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी प्रथमेशने त्याच्या होणाऱ्या बायकोचे कौतुक करत असे म्हटले की, “मी कॅमेऱ्यासमोर (दगडू) बनून लोकांना प्रेरणा दिली आहे किंवा माझ्याकडे बघून आता काही नवीन मुलं अभिनय करण्यासाठी या क्षेत्रात येतात. माझ्याकडून प्रेरणा घेत ते अभिनेता बनण्यसाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करायला येतात. तशी क्षितिजा ही खऱ्या आयुष्यात प्रेरणादायी आहे. तिला बघून काही मुली तिच्यासारखं बनण्याचे स्वप्न बघतात. लोकांना आपल्या कामाने प्रभावित करणे, लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेणे हे सगळं चित्रपटांमध्ये वगैरे होते. पण क्षितिजा हे सगळं तिच्या खऱ्या आयुष्यात करते आहे. आणि याचा मला अभिमान आहे.”
दरम्यान, प्रथमेश व क्षितिजा हे दोघे येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. लवकरच प्रथमेश-क्षितिजाचं लग्न होणार आहे. यासाठी प्रथमेशचे चाहते उत्सुक आहेत.