अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमेडीने सजलेला बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. या चित्रपटाचे ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोनही भाग चांगलेच गाजले. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ घवघवीत यशानंतर आता’फिर हेरा फेरी’चा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली. ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागाच्या घोषणेमुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. (Tabbu will be in Hera Pheri 3 movie)
‘हेरा फेरी’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. तर ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केलं होतं. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु चाहत्यांच्या मनातली गोष्ट घडली असून ‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळणार आहेत. प्रियदर्शनने ३० जानेवारी रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. अक्षय कुमारने प्रियदर्शनला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आणि म्हटले की, सेटवर तुझा वाढदिवस तुझ्यासोबत साजरा करण्याचा चांगला मार्ग आणखी कोणता असू शकतो.

यावर उत्तर म्हणून प्रियदर्शनने एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘मी रिटर्न गिफ्ट्स देखील देतो आणि मला ‘हेरा फेरी ३’ बनवायचा आहे. तुम्ही तयार आहात का? त्याने पोस्टमध्ये अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना टॅग केले.’ आणि तिघांनीही या पोस्टला प्रतिसाद दिला. यानंतर सुमारे तीन-चार दिवसांनी, आता सोमवारी, तब्बूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमारची पोस्ट शेअर केली आहे. याबरोबरच अभिनेत्रीने लिहिले की, “माझ्याशिवाय स्टारकास्ट पूर्ण होणार नाही”.
दरम्यान, प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी’ (२०००) चित्रपटात तब्बू दिसली आहे. या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग २००६ मध्ये आला. त्याचे दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केले होते. यामध्ये तब्बू दिसली नाही. दुसऱ्या भागात बिपाशा बसू, सुनील शेट्टी, अक्षय आणि परेश रावल यांच्याव्यतिरिक्त, राजपाल यादव आणि रिमी सेन दिसले. तब्बूच्या या पोस्टने ती सुद्धा आता ‘हेरा फेरी ३’चा भाग असण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. ‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बू असल्याच्या शक्यतेने अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.