दक्षिण सिनेसृष्टीतून नुकतीच एक दुखद बातमी समोर येत आहे. दक्षिण भारतीय चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन झाले. सोमवार, ४ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असे म्हटले जाते की वयाशी संबंधित समस्यांमुळे त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर काही काळ उपचार सुरू असल्याचेही वृत्त आहे. पुष्पलता यांच्या पश्चात पती एव्हीएम राजन, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्ता येताच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजलीही वाहिली आहे. (actress Pushpalata passed away)
पुष्पलता यांचा जन्म कोइम्बतूरमधील मेट्टुपलयम येथे एका कॅथोलिक चेट्टीनाड कुटुंबात झाला. वयाच्या नऊव्या वर्षी त्यांनी भरतनाट्यममध्ये प्रभुत्व मिळवले होते. १९५५ मध्ये ‘नल्ला थंगाई’ या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर, १९६२ मध्ये, त्यांनी ‘कोंगा नाट्टू थंगम’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुष्पलता यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे.

‘शारदा’, ‘आलयमणी’ आणि ‘कल्याणरमण’ सारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. पुष्पलता यांनी दक्षिणेतील सुपरस्टार शिवाजी गणेशन आणि रजनीकांत यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९६२ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी, १९६४ मध्ये पुष्पलता यांनी सुपरस्टार एव्हीएम राजन यांच्याशी लग्न केले.
आणखी वाचा – ‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बूही दिसणार? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाली, “माझ्याशिवाय…”
अभिनेता कायल देवराज यांनी पुष्पलता यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, “एव्हीएम राजन यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन झाले आहे”. दरम्यान, पुष्पलता यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनयाव्यतिरिक्त, दोन चित्रपटांची निर्मितीही केली. तथापि, दोन्ही चित्रपट अपयशी ठरले आणि यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.