‘बिग बॉसच्या १५’व्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून समाविष्ट झालेली अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी. शमिता ही शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे. शमिताने आपल्या अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा ‘मोहब्बते’ हा चित्रपट चांगलाच गाजला. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतंच तिने सोशल मीडिया अकाउंटवरून ‘पेरीमेनोपॉज’ नावाच्या स्थितीबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या आजाराबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर या आजाराची लक्षणं सांगत याबाबत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. (Shamita Shetty going through perimenopause condition)
शेअर केलेल्या व्हिडीओत शिल्पाची बहिण शमिता म्हणाली, “तुमच्यापैकी किती महिला अचानक वाढलेल्या वजनाचा त्रास होतो? तुम्हालाही सारखी भूक लागते का? व्यायाम करता पण त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही”. ती पुढे स्वतः अनुभवत असलेली लक्षणं सांगते की, “माझीही भूक वाढली आहे. स्वभावातही बदलत होताना दिसतो, हृदयाचे ठोके वाढले आहेत हा सगळा वेडेपणा आहे. इतकी सगळी लक्षणं, या सगळ्यात मला असं वाटतंय की मी एकटीच आहे. पण जेव्हा मी माझ्या वयाच्या इतर मैत्रीणींबरोबर बोलले त्यावेळी त्यांनी मला हीच लक्षण सांगितली. मुख्यतः डोळ्यासमोर अंधार येणं, वजन वाढणं आणि खूप भूक लागणं. त्यामुळे मला नेमकं काय झालं आहे काही कळत नाही. मी याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि मला ‘पेरीमेनोपॉज’बद्दल कळलं”.
ती पुढे सांगते, “मला पेरीमेनोपॉज म्हणजे काय हे माहित नव्हतं. मला वाटलं की एक विशिष्ट वयानंतर आपण यातून जातो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही कधीही या ‘पेरिमेनोपॉज’मधून जाऊ शकता. महिलांसाठी हे खूप कठीण पण वास्तव आहे. आपल्याला मासिक पाळी येते, आपण एका जीवाला जन्म देतो, आपल्याला हार्मोनल बदलांमधूनही जावं लागलं आता या यादीत पेरीमेनोपॉज जोडलं गेलं आहे”.
याबाबत जागरूकता निर्माण करणं महत्त्वाचं आहे असं सांगत शमिता म्हणाली, “मला खात्री आहे की अनेक महिलांना याबद्दल माहिती नसेल कारण मलाही माहित नव्हतं. आपण याबद्दल अधिक बोललं पाहिजे. एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे. हार्मोनल बदल होत आहे. मी या सगळ्यात एकटी नाही आहे. तुम्हाला माहित आहे का आपण किती हार्मोनल बदलांना समोरे जात आहोत. हे खरंच खूप कठीण आहे. एक स्त्री होणं खरंच सोपं नाही”, असं सांगत तिने महिलांना सतावत असलेल्या नविन आजाराबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे.