बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. राणी बऱ्याचदा लाइमलाइटपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय खासगी आयुष्याबाबत बोलणंही ती टाळते. मात्र आता बऱ्याच वर्षांनी राणीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त ती पहिल्यांदा अनेक विषयांवर भाष्य करताना दिसली. करोना काळात तिला वैयक्तिक आयुष्यामध्ये कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. याबाबत तिने सांगितलं आहे. पहिल्यांदाच तिने याबाबत उघडपणे भाष्य केलं.
‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२३’मध्ये राणीने हजेरी लावली होती. यावेळी ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चित्रपटाबाबत ती बोलत होती. दरम्यान तिने करोना काळात ती गरोदर असल्यातं सांगितलं. दुसऱ्यांदा आई बनण्याचं सुख राणी अनुभवनार होती. मात्र त्यादरम्यान एक दुःखद घटना घडली.
राणी म्हणाली, “मी सार्वजनिक ठिकाणी माझ्या खासगी आयुष्याबाबत पहिल्यांदाच बोलत आहे. ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही मी माझं दुःख व्यक्त केलं नाही. माझ्या खासगी आयुष्याचा संबंध येणाऱ्या चित्रपटासाठी जोडू नये असं मला वाटत होतं. चित्रपटासाठी हा फक्त युक्तीवाद आहे असं कोणी बोलू नये म्हणून मी व्यक्त होणं टाळलं”.
“करोनाकाळात म्हणजेच २०२०मध्ये मी दुसऱ्यांदा गरोदर होते. मी दुसऱ्यांदा आई बनणार होते. पण गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यामध्येच माझा गर्भपात झाला. दरम्यान आम्ही आमच्या बाळाला गमावलं”. २०१४मध्ये राणी व आदित्य चोप्रा यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या एक वर्षानंतर राणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. राणी व आदित्यला अदिरा नावाची मुलगी आहे.