प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये, गायक जो जोनास व अभिनेत्री सोफी टर्नर यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे, एका वर्षानंतर ३४ वर्षीय जो जोनासचे ६१ वर्षीय अभिनेत्री डेमी मूरशी संबंध असल्याच्या चर्चा व्हायरल होत आहेत. जो जोनास व डेमी मूर यांच्या फ्लर्टिंगच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यात आले असून यादरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आल्याचे बोलले जात आहे. (Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas)
‘चार्लीज एंजल्स’ आणि ‘इन्डिसेंट प्रपोजल’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली डेमी मूर अभिनयाबरोबरच तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. त्यामुळेच वयाच्या या टप्प्यावरही तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. डेमी मूर व जो जोनास नुकतेच एकत्र डिनर डेटला गेलेलेही दिसले. पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, यावेळी दोघांमधील जवळीक मैत्रीच्या पलीकडे असलेल्या नव्या नात्याचे संकेत देत होती.
जो जोनास व डेमी मूर फ्रान्समधील अँटिब्स येथील हॉटेल डु कॅप-एडन-रॉकमध्ये एकत्र जेवण करताना दिसले. हे दृश्य कान्समध्ये डेमी मूरच्या लोकप्रिय हॉरर चित्रपट ‘द सबस्टन्स’च्या प्रीमियरनंतर पाहायला मिळाले. येथे डेमीने amfAR Galaचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे जो जोनास त्याचा भाऊ निक जोनासबरोबर अचानक कार्यक्रमात पोहोचला. बरं, सोफी टर्नरपासून विभक्त झाल्यानंतर जो जोनासचे नाव एखाद्याशी जोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जोनास ब्रदर्स बँडचा हा गायक मॉडेल स्टॉर्मी बीबरोबरही दिसला होता. या दोघांनी जवळपास पाच महिने डेट केल्याचे बोलले जात आहे. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
मात्र, या सगळ्या दरम्यान, एका विश्वसनीय सूत्राचा हवाला देत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटले गेले आहे की, त्यांची ही डिनर देत मैत्रीपूर्ण होती. जो जोनास व डेमी मूर यांच्यात असे काहीही नाही ज्याबद्दल इतके बोलले जात आहे. असे म्हटले जाते की जो जोनास हा डेमी मूरचा स्टायलिस्ट ब्रॅड गोरेस्की आणि व्यवस्थापक जेसन वेनबर्गचा मित्र आहे. यामुळेच त्याची डेमीशी मैत्री झाली. ‘अ फ्यू गुड मेन’ सारख्या सुपरहिट चित्रपटांतून लोकप्रियतेस आलेल्या डेमी मूरचा घटस्फोट झाला आहे. तिने तीन वेळा लग्न केले आहे. २०११ मध्ये तिने तिचा तिसरा पती अभिनेता ॲश्टन कुचर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर ती अविवाहित आहे. डेमी तीन मुलांची आई आहे आणि एका मुलाची आजी देखील आहे. डेमी मूरचा दुसरा नवरा ब्रूस विलिस आहे, जो सध्या फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया या आजाराने ग्रस्त आहे.