९०च्या दशकात बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी २४ वर्षांनी भारतात परतली आहे. भारतात येताच तिने खास व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती भावुक झालेली दिसली. करिअरच्या शिखरावर असतानाच २००० साली ममता देश सोडून गेली होती. २००० कोटींच्या ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती. केन्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग ग्रुपबरोबर कनेक्शन असल्याचा तिच्यावर आरोप होता. यामध्ये तिच्याबरोबर विकी गोस्वामी आणि इतर आरोपीही होते. ती इतक्या वर्षांनी भारतात का परतली, याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात होते. ती बॉलिवूड कमबॅक करणार का किंवा ‘बिग बॉस’मध्ये ममता एन्ट्री घेईल का, असाही अंदाज वर्तवण्यात आला. (mamta kulkarni on her journey of outside india)
अशातच अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने या विषयांवर आपले मौन सोडले. ममताने तिच्या परतण्याचे कारण सांगितले असून, भारताबाहेर घालवलेला वेळ, तिचा आध्यात्मिक प्रवास आणि तिने कारकिर्दीच्या शिखरावर चित्रपट इंडस्ट्री सोडण्याचा घेतलेला निर्णय याविषयी भाष्य केले. बराच काळ गायब झाल्यानंतर ममताने स्वतःची तुलना गौतम बुद्धांशी केली आहे. तिने ‘न्यूज१८’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “मी सत्याच्या शोधात निघाले होते. जसे गौतम बुद्ध निघाले. मी फक्त तपश्चर्या करत होते. भक्तीत तल्लीन होते”.
आणखी वाचा – तुझ्या रंगी सांज रंगली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे Unseen Photo व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव
करिअरच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडल्याची आठवण सांगताना ती म्हणाली की, “माझ्याकडे ४० चित्रपट, ०३ फ्लॅट, ०४ कार होत्या, जगभरात ५० कॉन्सर्ट केले. पण मी हे सर्व काही मागे सोडले”. यापुढे ममताने स्पष्ट केले की, तिच्या भारतात परतण्याचा आणि बॉलिवूडमध्ये संभाव्य पुनरागमनाचा काहीही संबंध नाही. याबद्दल ती म्हणाली, “मी बॉलिवूडमध्ये परत जाण्यासाठी इथे आलेले नाही. मी एक मध्यम मार्ग शोधत आहे आणि माझ्या आध्यात्मिक मार्गावर चालत राहीन. प्रत्येक गोष्ट त्या त्या वयानुसार चांगली वाटते. मी त्या टप्प्याचा आनंद घेतला आहे आणि आता मी पुढे गेले आहे”.
अभिनेत्रीने हेही सांगितले की, ती भारतात येण्याचे मुख्य कारण कुंभमेळा आहे. आगामी कुंभमेळा अनुभवण्यासाठी ती परतली आहे. तिने म्हटले की, “तिच्या आध्यात्मिक प्रवासात आणि चित्रपटांपासून दूर असलेल्या जीवनात समाधानी आहे”. तसंच तिने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याच्या किंवा तिच्या अभिनय कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करण्याच्या अफवादेखील फेटाळून लावल्या आहेत.