बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर आपल्या संन्यासाची घोषणा केली आणि आपले नावही बदलले. यानंतर त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या. महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर त्यांनी ही पदवी धारण केली होती. मात्र नुकतच त्यांना या पदावरुन काढण्यात आले. ही कारवाई किन्नर अखाराचे संस्थापक अजय दास यांनी केली. अजय दास यांनी जाहीर केले की, किन्नर अरेनामध्ये आता पुनर्रचना केली जाईल. तसेच, लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वरची घोषणा केली जाईल. नंतर ममता कुलकर्णींवर आरोप करण्यात आला की, त्यांनी महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले होते. (Mamta Kulkarni on Mahamandeleshwar allegations)
या आरोपांवर आता स्वत: ममता कुलकर्णींनी भाष्य केलं आहे. ममता कुलकर्णी नुकत्याच ‘आप की अदालत’मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. यातील एक आरोप किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये देण्याबाबत होता. यावर ममता यांनी उत्तर दिले की, “माझ्याकडे एक कोटी रुपयेही नाहीत. माझी सर्व बँक खाती सरकारने जप्त केली आहेत. माझ्या खात्यात एक कोटी रुपयेही नाहीत”.
यापुढे ममता यांनी गुरुला भेट देण्यासाठी दोन लाख रुपये उसने घेतल्याचेही सांगितले. याबद्दल ममता म्हणाल्या की, “माझे मुंबईत तीन अपार्टमेंट होते, मात्र मी परदेशात राहत होती. बराच वेळ माझ्या अपार्टमेंटला कोणीही भेट दिली नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे”. ममता कुलकर्णी दोन दशकांहून अधिक काळ देशाबाहेर राहात होत्या. भारतात परत आल्यावर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि नुकताच त्यांनी संन्यासही घेतला.
आणखी वाचा – गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ…; ‘दहावी-अ’ नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?
प्रयागराजच्या महाकुंभमध्ये त्यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून पिंडदान केले. यानंतर ममता कुलकर्णीचा पट्टाभिषेक करण्यात आला. ममता महाकुंभात सात दिवस राहिल्या, मात्र वादानंतर त्यांना महामंडलेश्वर पदावरुन हटवण्यात आले.