मनोरंजन क्षेत्रात सध्या घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे. नुकताच रीलस्टार, अभिनेत्री धनश्री वर्मा व क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. या घटस्फोटासाठी धनश्री जबाबदार असल्याचे म्हंटले जात आहे. याबद्दलच्या पोस्टदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. मात्र अनेकांनी धनश्रीला पाठिंबादेखील दर्शवला आहे. मात्र याआधी क्रिकेट विश्वातील खेळाडू हार्दिक पांड्या व मॉडेल नताशा स्टॅन्कोव्हिक यांनी देखील वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ते वेगळेदेखील झाले. मात्र मुलगा अगस्त्यच्या निमित्ताने दोघं एकत्रदेखील येतात. या घटस्फोटासाठीदेखील नताशाला जबाबदार धरण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक जोड्या वेगळ्या झाल्या ज्यासाठी महिलांना जबाबदार ठरवले. (divorce blame on wives)
या लिस्टमध्ये ‘हिरामंडी’ वेबसीरिजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे संजीदा शेख. अभिनेता अमीर अलीबरोबर ती लग्नबंधनात अडकली होती. मात्र त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे बाहेर अफेअर असल्याचा आरोप केला जाऊ लागला. त्यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. संजीदाला मुलगी असून ती एकटी मुलीचा सांभाळ करत आहे.
अभिनेत्री मलायका आरोरा व अरबाज खान यांच्या घटस्फोटाची चर्चा खूप रंगली होती. लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायकाचे बाहेर अफेअर चालू असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगल्या. अरबाज व मलायका यांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका व अर्जुन यांचे अफेअर होते. मात्र काही वर्षामध्येच त्यांचा ब्रेकअपदेखील झाला. सध्या मलायका सिंगल आहे.
अभिनेता हृतिक रोशन व सुजॅन खान यांच्या घटस्फोटाची चर्चादेखील रंगली. त्यांचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला आहे. हृतिक व सुजॅन यांचे २००० साली लग्न झाले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये दुरावा येऊ लागला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सुजॅनने पोटगी घेण्यासाठी घटस्फोट घेतल्याचेही बोलले गेले. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू व नागाचैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चादेखील झाली. अधिक पोटगी घेण्यासाठी समंथाने घटस्फोट घेतला असे म्हंटले गेले. मात्र नागाच्या कुटुंबाने समंथाने एकही पैसा न घेतल्याचे स्पष्ट केले.