जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्याबरोबर लग्नाच्या प्रत्येक दिवशी उपस्थित होती आणि तिने या लग्नात खूप मज्जाही केली. अनेक खाद्यपदार्थांचा आस्वादही तिने यावेळी घेतला. आणि याचा तिच्या दिनचर्येवर मोठा परिणाम झाला. लग्नाच्या धावपळीत तिला पूर्ण विश्रांती घेता आली नाही. यामुळे आता जान्हवीची प्रकृती खालावली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या बदललेल्या दिनचर्येचा तिच्यावर परिणाम झाला आणि जान्हवीला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Janhvi Kapoor Hospitalised)
अभिनेत्रीच्या एका जवळच्या मित्राने ‘झूम’ला सांगितले की, “अन्न विषबाधाचे हे गंभीर प्रकरण आहे. बुधवारी जान्हवी घरीच बेडवर पडली होती, तिला खूप अशक्त वाटत होते. बुधवारी आपली सर्व कामे रद्द करुन ती कामे तिने उर्वरित दिवसांत पूर्ण करण्यास सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे ठरवले आणि तिला रुग्णालयात दाखल केले आहे. लवकरच ती बरी होण्याची आशा आहे. शुक्रवारपर्यंत तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जान्हवी कपूरला लवकर बरे वाटावे अशी प्रार्थनाही करण्यात येत आहे”.
काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जान्हवी कपूरने तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सने खळबळ उडवून दिली होती. तिच्या इन्स्टा हँडलवर अभिनेत्रीने शुभ आशीर्वाद सोहळ्यातील तिचा लूक शेअर केला. जान्हवीने फोटो शेअर करताच तिचे वडील बोनी कपूर, तिचा प्रियकर शिखर पहाडिया व अनेक मित्र तिच्या लूकचे चाहते झाले.
१२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत व राधिकाच्या लग्नात जान्हवी कपूरने गोल्डन लेहेंगा परिधान केला होता. पापाराझीसाठी पोझ देताना तिच्या जबरदस्त दिसण्याने तिने सर्वांवर जादू केली. कार्यक्रमाच्या आतील व्हिडीओमध्ये, जान्हवी शिखर पहाडियाबरोबर सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसत होती. आता जान्हवी आजारी असून चाहतेमंडळी तिच्याबाबत काळजी व्यक्त करत आहेत.